JEE - नव्या परीक्षेचं आव्हान पेलणार कसं.?

- डॉ. सुनील कुटे

(प्राचार्य, के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक.)

(शब्दांकन - ऑक्सिजन टीम)


जेईई फायद्याची की तोट्याची.?

एकच एक परीक्षा ठरवेल का

इंजिनिअरिंगच्या स्वप्नाचं भवितव्य.?

मराठी माध्यमवाल्यांचा निभाव लागेल

नव्या राष्ट्रीय स्पर्धेत.? क्लास लावून होईल

अभ्यासाची तयारी पूर्ण.?

या प्रश्नांची रोखठोक आणि खरीखरी उत्तरं.

इंजिनिअरिंग कॉलेजसाठी एकच सामायिक परीक्षा होणार, असा निर्णय जाहीर झाला आणि मुलांसह पालक संभ्रमात पडले.

पहिला प्रश्न होता, आता आपलं कसं होणार.?

खरं तर पालकांना आणि मुलांनाही हायसं वाटावं, असा हा ‘जॉइंट एण्ट्रन्स एक्झामिनिशन’चा म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षेचा निर्णय आहे.

आजपर्यंत वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रवेशपरीक्षा व्हायच्या. सरकारी कॉलेजसाठीची प्रवेशपरीक्षा वेगळी, आयआयटीच्या वेगळ्या, खासगी कॉलेजच्या वेगळ्या. अशा कितीतरी परीक्षा. एका विद्यार्थ्याला किमान सात-आठ परीक्षा द्याव्या लागत. कुणाही विद्यार्थ्यासाठी एवढय़ा परीक्षा, त्यासाठीचा अभ्यास हे एक दिव्यच होतं. अनेक परीक्षांसाठी वेगवेगळे क्लास. त्यांची लाखोने फी. या क्लासला जावं की त्या, या विचारात विद्यार्थ्यांची ओढाताण व्हायची. पालकांवर खर्चाचा अतिरिक्त बोजा पडायचा तो वेगळाच.

मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांच्या पुढाकाराने झालेल्या या निर्णयानुसार आता इंजिनिअरिंगसाठी एकच देशव्यापी संयुक्त प्रवेशपरीक्षा होणार आहे. विशेष म्हणजे गुजरात, हरियाणा आणि महाराष्ट्राने हे नवीन शैक्षणिक मोड्युल येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २0१३ पासूनच अमलात आणायचा निर्णय घेतला आहे.

संयुक्त प्रवेशपरीक्षेला आधी अनेक राज्यांचा आणि आयआयटीसारख्या संस्थांचा विरोध होता. या प्रवेशपरीक्षेला अधिक महत्त्व आल्याने बारावीला काहीच महत्त्व उरणार नाही, असा काही जणांचा दावा होता. वस्तुस्थितीही तशीच होती. अनेक प्रवेशपरीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना बारावीचे मोल वाटेनासे झाले होते. बारावीच्या परीक्षेला काही महत्त्वच नाही, जेमतेम काठावर उत्तीर्ण झाले तरी चालेल, असाच एक सर्वसाधारण समज झाला होता. त्यानुसार अनेक विद्यार्थी महाविद्यालयात केवळ हजेरी लावण्यापुरते किंवा परीक्षेपुरते जात होते. प्रवेशपरीक्षा हमखास उत्तीर्ण करण्याचे वेगवेगळे पॅटर्न्‍सही तयार झाले. बारावी केवळ उपचारापुरती उरली.

ही संयुक्त प्रवेशपरीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर बारावीच्या परीक्षेतील गुणांनाही काही महत्त्व असावे, अशी मागणी करण्यात येऊ लागली. ती मागणी मान्य झाली आणि बारावीच्या गुणांना ५0 टे महत्त्व आणि जेईईच्या गुणांना ५0 टे महत्त्व, अशी विभागणी करण्यात आली.

त्यानुसार आता जेईईचा निर्णय झाला आणि पुढच्या वर्षापासून त्याची अंमलबजावणीही सुरू होईल.

जेईईची वाट सोपी असेल..?

‘जेईई’ म्हणजेच संयुक्त प्रवेशपरीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येईल. म्हणजे आता स्पर्धा केवळ राज्यापुरती र्मयादित नाही, तर देशव्यापी आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातली मुलं टिकतील का, असा प्रश्न पडणं रास्त आहे. मात्र एकाएकी राष्ट्रीय स्पर्धेत भव्य यश मिळत नसतं. त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून मुलांची तयारी उत्तम असणं गरजेचं आहे. आपल्याकडे मुळात प्राथमिक शिक्षणाकडेच दुर्लक्ष होतं. प्राथमिक शिक्षणातली गळती रोखण्यासाठी केवळ संख्येवर लक्ष पुरवण्यात आले; पण दर्जा मात्र घसरला. ग्रॉस एनरोलमेण्ट रेशो अर्थात जीईआर वाढवण्यावर भर देण्यात आला. वर्गातली मुला-मुलींची संख्या वाढली. आजच्या घडीला महाराष्ट्राचा जीईआर देशात सर्वाधिक आहे, ही प्रतिष्ठेची बाब आहे. पण जीईआर वाढला, मुलं वाढली म्हणजे शिक्षकांचा शिकवण्याचा दर्जा आणि मुलांची गुणवत्ता वाढली, असं होत नाही.

अनेक मुलांना आपण काय शिकतो, काय शिकतो याचा काही थांगपत्ता नाही. केवळ नाव आणि नंबर टाकण्यापुरता त्यांचा अभ्यास. ही अशी फौज यापुढच्या काळात दहावी-बारावीत येणार आहे. त्या फौजेतलेच काही जण या राष्ट्रीय पातळीवर सीईटीला बसणार आहेत. त्यांचा पायाच जर कच्चा राहिला असेल तर राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेत ते काय गुणवत्ता दाखवणार.?

हे सारं इतक्या तपशिलानं सांगण्याचं कारण म्हणजे यावर्षी ही परीक्षा होणार म्हणून यावर्षीच तयारीला लागल्यानं आपला दर्जा एकाएकी सुधारणार नाही. त्यासाठी आपल्याला बरीच आधीपासून तयारी करावी लागणार आहे. तरच या परीक्षेत निभाव लागेल. कारण देशव्यापी स्पर्धा मोठी आहे, जागा मात्र तेवढय़ाच. चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवायचा असेल तर ही स्पर्धा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणं क्रमप्राप्त ठरणार आहे.

त्यामुळे जेईईची ही वाट दिसते तितकी सोपी नाही. त्या वाटेवर मेहनत आणि गुणवत्ताच टिकेल. त्यादृष्टीनं तयारीला लागलेलं बरं.

खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाचं काय.?

महाराष्ट्रात खासगी इंजिनिअरिंग कॉलेजचं प्रमाण मोठं आहे. बारावीला मुला-मुलीला ४0 टे गुण मिळाले तरी त्यानं इंजिनिअरच व्हावं, असं वाटणार्‍या पालकांचं प्रमाण मोठं आहे. बीए करून तरी मुलगा काय करणार, त्यापेक्षा बीई करू देत; असा एकूण पवित्रा. त्यासाठी पालक पैसे उभे करतात आणि मिळेल त्या खासगी कॉलेजात मुला/मुलीचा प्रवेश करवून मोकळे होतात. इंजिनिअर होण्याची त्यांची पात्रता आहे की नाही, याचाही ते विचार करत नाही. त्यात महाविद्यालयांची संख्या जास्त. त्यामुळे पैसे असतील तर प्रवेश सोपे होतात; पण या मोहात अडकायचं की नाही हे पालकांनीच ठरवायला हवं. पालक त्या मोहात अडकतात. वाट्टेल तेवढे पैसे भरून प्रवेश घेतात.

मात्र मुळात आपली क्षमता आहे का, हे मुलामुलींनी आणि पालकांनी वेळीच जोखलेले बरे. या प्रवेशपरीक्षेत आपण कितपत पाण्यात आहोत हे सगळ्यांना कळेलच. ते नीट समजून प्रवेश घेतलेला बरा; अन्यथा इंजिनिअर होऊन बेरोजगारांच्या फौजेत दाखल होण्यापलीकडे दुसरं काही हातात उरणार नाही. त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी हा विचार पालकांनी आणि मुलांनीही केलेला बरा.!

इंग्रजी माध्यमवाले जातील का पुढे.?

माध्यमाचा बाऊ आपल्याकडे फार केला जातो. इंग्रजी माध्यमात शिकणार्‍यांचाच या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेशपरीक्षेत निभाव लागेल आणि मराठी माध्यमवाले मागे पडतील हा निव्वळ गैरसमज आहे. मुळात माध्यमाचा या प्रवेशपरीक्षेशी काहीही संबंध नाही. ही प्रवेशपरीक्षा म्हणजे आयक्यू, अँनालिसिस, प्रोब्लेम सोल्विंग अँबिलिटी यांची परीक्षा असेल. त्यामुळे इंग्रजी ज्यांना येतं तेच पुढे जातील या गैरसमजाला काही अर्थ नाही. तसंही इंग्रजी माध्यमात शिकणारे सारेच फार हुशार असतात, असं काही नाही. इंग्रजी माध्यमातही नापास होणार्‍यांचं प्रमाण आहे. त्यामुळे माध्यम महत्त्वाचं नाही, तुमची गुणवत्ता आणि अभ्यासच महत्त्वाचा हे लक्षात ठेवलेलं बरं.!

तयारी करायची कशी.?

एका रात्रीत या परीक्षेची तयारी होणार नाही हे तर खरंच. मुळात शिक्षणाचा पाया पक्का हवा. विषय उत्तम समजलेला हवा आणि हवा फोकस. आपण इंजिनिअर का होणार आहोत या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं शोधलं पाहिजे. ते मिळालं तरच या प्रवेशाच्या तयारीवर फोकस करणं सोपं होऊ शकेल. तो केला नाही, तयारी अपुरी राहिली तर देशपातळीवरील या स्पर्धेत महाराष्ट्रातली मुलं मागे पडतील. त्यामुळे तुम्ही देणारच असाल ही प्रवेशपरीक्षा तर फेसबुक, चॅट, सिनेमे हे बंद करून पूर्ण फोकस अभ्यासावरच ठेवावा लागेल. आता बारावीच्या मार्कांनाही ५0 टे महत्त्व दिले जाणार आहे त्यामुळे बारावीची तयारीही मन लावून करावी लागेल. कॉलेजला दांड्या मारून चालणार नाही.

मुख्य म्हणजे हे लक्षात ठेवायला हवं की, केवळ क्लास लावून हा अभ्यास होणार नाही. मुळात क्लास लावून आपण काय शिकणार याचाच विचार करायला हवा.

स्वत: तयारी केली नाही, वरवर अभ्यास केला किंवा केलाच नाही तर टिकाव लागणार नाही. ज्यांची तयारी उत्तम तेच या नव्या संयुक्त प्रवेशपरीक्षेच्या काळात टिकतील, बाकीचे डुबतील.

तसे होणे टाळायचे असेल आणि चांगल्या कॉलेजला प्रवेश हवा असेल तर इंजिनिअर होण्याचे स्वप्न अत्यंत गांभीर्यानं पाहणं गरजेचं झालेलं आहे.

येणारा काळ अतीव स्पर्धेचा आहे हे लक्षात ठेवलेलं बरं.!

----------***----------

या परीक्षेने कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश मिळेल.? सर्व सरकारी, केंद्र सरकार अनुदानप्राप्त, आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी यांसह सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजांसाठी ही एकच प्रवेशपरीक्षा महत्त्वाची ठरेल. या परीक्षेत मिळणार्‍या गुणांनुसार मेरिटप्रमाणो प्रवेश पात्र ठरेल.

जेईई म्हणजे काय.?

इंजिनिअरिंगसाठी राष्ट्रीय पातळीवर होणारी संयुक्त प्रवेशपरीक्षा. अर्थात जॉइंट एण्ट्रन्स एक्झाम. जुन्या आयआयटी-जेईई, एआयईईई या परीक्षांऐवजी ही परीक्षा घेण्यात येईल. सर्व सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेशासाठी ही जेईई ही एकच परीक्षा देणं आता पुरेसं ठरेल.

बारावीच्या गुणांचं काय.?

बारावीचे ५0 टे गुण आणि या प्रवेशपरीक्षेचे ५0 टे गुण, असे एकत्र गुणांकन ठरेल.

आयआयटीत प्रवेश घ्यायचा असेल तर दोन जेईई होतील का.?

बारावीची परीक्षा, एक जेईई आणि एक अँडव्हान्स जेईई अशीही या परीक्षेची विभागणी आहे. ज्यांना आयआयटीत प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही एक अँडव्हान्स जेईई असेल. ती परीक्षा आयआयटीचे जॉइंट अँडमिशन बोर्डही घेईल. आयआयटीसाठी वेगळी यादी तयार होईल आणि इतरांसाठी वेगळी. अर्थात, ज्यांची आयआयटी प्रवेशासाठी निवड झाली आहे ते अन्यही कॉलेजात प्रवेश घेऊ शकतील.

आता बारावीत असलेल्यांसाठी खास

जे यंदा बारावीत आहेत आणि २0१३ला ज्यांना ही जेईई द्यायची आहे, ते जर आपल्या बारावीच्या मार्कांवर खूश नसतील तर ते आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी २0१३ मध्ये पुन्हा बारावीची परीक्षा देऊ शकतील. आपले मार्क वाढवण्याची त्यांना एक जास्तीची संधी देण्यात येणार आहे

‘जेईई’ने गुणवत्ता वाढेल - कपिल सिब्बल

मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल म्हणतात, ‘कोचिंग क्लासच्या व्यवसायाला या नव्या जेईईने आळा बसेल. मुलांकडून वारेमाप फी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांसाठी घेण्यात येत होती. आता ते आर्थिक ओझं कमी होईल, मानसिक ताणही कमी होईल. वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेज वेगवेगळी फी आणि कॅपिटेशन फी घेत होते त्यालाही आळा बसेल आणि इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा दर्जा वाढवायला मदत होईल.