अझरूद्दीनवरील बंदी बेकायदेशीर

ऑनलाइन टीम

हैद्राबाद, दि. ८ - भारताचा माजी कप्तान मोहम्मद अझरूद्दीनवर मॅच फिक्सिंग प्रकरणी आजीवन क्रिकेट न खेळण्याची बंदी बेकायदेशीर असल्याचे सांगत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे.

मोहम्मद अझरूद्दीन मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने २००० साली डिसेंबरमध्ये अझरूद्दीनवर आजीवन बंदी घालत त्याची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आणली होती. विशेष म्हणजे मॅच फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळूनही अझरने आपली पुढली इनिंग राजकारणात सुरू केली आणि लोकांनीही त्याला निवडून देत खासदार केलं. एवढं असलं तरी त्याच्या डोक्यावर क्रिकेटच्या आजीवन बंदीचं भूत होतं, जे आता या निर्णयामुळे उतरलं आहे. क्रिकेटचा विचार करता अझर यापुढे खेळण्याची शक्यता नसली तरी किमान कायदेशीर बंदी नसल्याचा मानसिक दिलासा त्याला मिळणार आहे.

खालच्या कोर्टात बीसीसीआयच्या निर्णय योग्य असल्याचा निकाल लागल्यानंतर अझरने आंध्र हायकोर्टात धाव घेतली होती. सध्या ४९ वर्षांचा असलेला अझक उत्तर प्रदेशातील मोरादाबादमधून लोकसभेवर निवडून आला आहे. कसोटीमध्ये पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकवण्याचा विक्रम करणारा अझर भारताचा सर्वात यशस्वी कप्तान होता.

एकूण ९९ कसोटींमध्ये अझरने ६,२१५ धावा केल्या आहेत. तर एकूण ३३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ९,३७८ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ वर्षे खेळलेल्या अझरची कारकिर्द मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे १२ वर्षांपूर्वी अचानक संपुष्टात आली होती.