आंदोलन पसरले

बारामती। दि. १३ (प्रतिनिधी)

खासदार राजू शेट्टी यांना काल अटक झाल्यानंतर इंदापूर तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आज मंगळवारी हे आंदोलन आणखी पसरले. सोमेश्‍वरनगर येथे बैलगाड्याचे टायर फोडण्यात आले. इंदापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर शिरूर तालुक्यात रास्ता रोको झाला.

खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व सतिश काकडे यांना अटक केल्याने उस दर आंदोलन चिघळले आहे. संतप्त आंदोलकांनी मंगळवारी (दि. १३) सोमेश्‍वर कारखान्याकडे जाणार्‍या १५ बैलगाडयांचे टायर फोडले.

दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटनांच्या धमकीला बळी न पडता सोमेश्‍वरच्या संचालकांनी कारखाना चालू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटाही मागविला आहे. कारखान्याच्या उसतोडी ज्या ठिकाणी चालू आहेत. त्याठिकाणापासून कारखान्यापर्यंत पोलीस बंदोबस्तात उस आणला जात आहे. काल सोमेश्‍वर ने उसाला तोडी दिल्या असून आज दुपार कारखान्याने १५३८ मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. पोलीस बंदोबस्त असला तरीही ऊस तोडणी कामगार भितीच्या वातावरणातच ऊसतोड करीत आहेत. त्यामुळे आजच्या झालेल्या प्रकारामुळे त्यांच्या दहशतीत आणखीनच भर पडणार आहे. आज दुपारी उसतोडणी कामगार वाणेवाडी (मळशी) याठिकाणी फत्तेसिंह जगताप यांच्या शेतातून उसगाडया भरून कारखान्याच्या दिशेने निघाला होता. दिग्वीजय जगताप यांच्या वस्तीजवळ मोठया उसातून तोंडे बांधून आलेल्या ७ ते ८ आंदोलकांनी बैलगांडयांवर दगडफेक करत लोखंडी सळईने टायर फोडले.

काही टायरमधील हवा सोडली. तर काही टायर पंम्चरचे सुलोचन टाकून पेटविले. ही घटना घडली तेव्हा या बैलगाडयांना पोलीस संरक्षण नव्हते. मात्र पाठीमागून पोलिसांची गाडी येताना दिसताच आंदोलकांनी उसातून

पळ काढला.

ऊसदर वाढ आंदोलनामध्ये दोन आंदोलक शेतकर्‍याचा बळी गेल्याने तसेच खासदार राजू शेट्टी यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती, शेतकरी संघटना व युतीच्या वतीने आज (दि. १३) दुपारी आंधळगाव फाटा रास्ता रोको करण्यात आला. संतप्त आंदोलकांनी आघाडी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना पाचर्णे म्हणाले की, लोकशाही मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन सरकार पोलिसी बळाचा वापर करून चिरडू पाहत आहे. मात्र या गोष्टीची किंमत आघाडी सरकारला मोजावी लागणार आहे. याप्रसंगी सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकरी कृती समितीचे कार्याध्यक्ष दादा-पाटील फराटे घोडगंगाचे संचालक अनिल शेलार, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामचंद्र निंबाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल काशिद आबासाहेब गव्हाणे राजेंद्र गायकवाड पोपटराव शेलार, शंकरराव फराटे अनिल पवार, रमेश शेलार पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे, काका खळदकर, हमीद पठाण, संभाजी फराटे, संतोष काळे, सुखदेव राक्षे, रवींद्र थोरात आदी उपस्थित होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी शंकरराव केंगार, तहसिलदार रघुनाथ पोटे यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त होता.