‘आधारभूत’ अर्थहीन!

संजय जोशी। दि. ६ (धुळे)

शासनाची आधारभूत किंमत योजना अर्थहीन आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले. ही योजना बंद करून शेतकर्‍यांना

खुल्या बाजारात माल विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘आधारभूत’ योजना नावाला राहिली आहे. तिच्या केंद्रांचे उद्घाटन होते. पण जागेअभावी ती दुसर्‍याची दिवशी बंद पडतात. शेतकरीही या केंद्रांकडे फिरकत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर ‘लोकमत’ने शेतकरी संघटनेची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी देवांग म्हणाले, भारतातील कोणतीही योजना राजकीय हस्तक्षेपाशिवाय लागू होत नाही. आधारभूतमध्येही तेच आहे. शासकीय आणि राजकीय हस्तक्षेपाने शेतकर्‍यांना जखडून टाकायचे हाच त्यामागील मुख्य हेतू आहे.

आयात-निर्यात खुली करा

आधारभूत केंद्रे उघडण्यापेक्षा सरकारने शेतमालाची आयात-निर्यात खुली करावी. शेतकर्‍यांना खुल्या बाजारात माल विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

बाजार समित्याही बंद करा

आधारभूत केंद्रांप्रमाणेच बाजार समित्याही बंद केल्या पाहिजेत, असे मत देवांग यांनी व्यक्त केल्या. बाजार समितींमधील भाव खुल्या बाजारापेक्षा कितीतरी कमी असतात. मात्र शेतकर्‍यांना तेथेच माल विकावा लागतो. ही सक्ती कशासाठी?