आयुष्याचं स्थिर चित्रण

चित्रभाषा

- शर्मिला फडके

आरांची चित्रं मी अनेकदा पाहण्यात आली होती. स्टीललाईफ्स, न्यूड्स, लॅन्डस्केप्स. खरं तर आरांचे चित्रविषय काही फार वेगळे नव्हते. पण हे वेगवेगळे चित्रविषय ते ज्या बेमालूमपणे एकमेकांमध्ये सरमिसळ करून चितारतात ते विलक्षण आहे. ही स्थिरचित्रे आहेत की निसर्गचित्रे, न्यूड्स आहेत की स्थिरचित्रे असा संभ्रम मनात अनेकदा उघड्या खिडक्यांमधून आत डोकावणार्‍या निसर्गात मिसळून गेलेली टेबलावरच्या फुलदाण्यांमधली फुले, बशांमधली फळे, मोहक आकारांची भांडी भोवतालच्या अवकाशात कोरल्यासारखी आणि त्या अवकाशाचाच एक भाग असल्यासारखी उमटून आलेली जिवंत स्थिरचित्रे. त्यांच्या त्या काहीशा बेढब, ओबडधोबड रेषांमध्ये पुष्टतेनं सामावलेल्या, गूढपणे क्षितिजापार पाहत असलेल्या पाठमोर्‍या गडद, काळसर, अगदी लालभडक किंवा निळ्याही वर्णातल्या नग्न तेलंगणी स्त्रिया. त्या स्त्रियाही वेगवेगळ्या आहेत असं कधी वाटलं नाही. एकाच स्त्रीचे वेगवेगळ्या क्षणांमध्ये स्थिरावलेले ते नग्न देह. स्त्रीदेहाचं स्थिरमग्न आदिम रूप. त्या स्त्रीच्या नग्नतेची वळणं आपल्यात सामावून घेणारी एखादी फुलदाणी पार्श्‍वभूमीवर हवीच. त्यातली फुलं कधी टवटवीत, कधी कोमेजून माना टाकलेली. नग्न मौनांचा अर्थ त्यातूनच शोधायचा कारण आरांची न्यूड्स त्याव्यतिरिक्त फारसा संवाद न साधणारी.

स्थिरचित्र किंवा स्टीललाईफ हा प्रकार भारतात एक पेंटिंगचा प्रकार म्हणून रुजवण्याचं श्रेय के. एच. म्हणजेच कृष्णाजी हौलाजी आरा यांचे. सातत्याने त्यांनी ही स्थिर-चित्रे रंगवली. ही स्थिर-चित्रं जिवंत रचना वाटतात. आपण फुलदाण्या नाही, त्या जागी एखादं व्यक्तिचित्र बघतो आहोत असा भास होतो. चेहर्‍यावरच्या भावभावनांसकट. स्थिरचित्र असो, नग्न देह असो, आरांना चित्रांचा आत्मा गवसला होता हे निश्‍चित. आर्टस्कूल्समध्ये चित्रकलेची प्राथमिक ओळख करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्टीललाईफ काढायला सांगतात. स्वयंशिक्षित आरांनी त्यांच्या कला-कारकीर्दीमध्ये जास्तीत जास्त स्टीललाईफच रंगवावेत, स्टीललाईफ ही आराची ओळख बनावी हे सहज निश्‍चित नाही. अट्टहासाने ते फुलदाण्या रंगवीत होते. फुलांसकट किंवा फुलांवाचूनही. त्याची काही स्टीललाईफ खूप गुंतागुंतीची रचना असलेली, लॅन्डस्केप आणि न्यूड यांची सरमिसळ असलेली.

आरानी सुरुवातीच्या काळात आणि नंतरही इतकी स्टीललाईफ आणि न्यूडस का रंगवली? चित्रकार नेमक्या कोणत्या प्रेरणेतून त्याची चित्र रंगवत असतो हा निरंतर कुतूहलाचा विषय. न्यूड, स्टीललाईफ, लॅन्डस्केप्स. आरा मूकपणे या वेगवेगळ्या चित्रांमधून जो संवाद साधत असतात तो ऐकायचा प्रयत्न करताना, त्यांच्या स्टीललाईफमधली प्रतीकात्मकता शोधत राहण्यात मजा येत असते. गायतोंडेंची चित्र पाहत असताना मनावर एक प्रकारचा ताण येतो, सूझाची चित्र पाहताना संवेदनांना जो धक्का पोहोचतो तसं आरांच्या चित्रांच्या बाबतीत होत नाही.

आरांनी केलेली न्यूड्स हा एक स्वतंत्र विषय आहे. कदाचित आपल्यातल्या मुस्लीम धार्मिकतेच्या कडव्या संस्कारांमध्ये अडकून पडलेल्या, नैतिक संकोचात गुदमरलेल्या कलाप्रेरणांना मुक्त करण्यासाठी आरांच्या एकाकी मनाने केलेला तो विद्रोह असू शकतो. कदाचित सूझा करत असलेल्या न्यूड्समुळेही ते प्रेरित झाले असू शकतात किंवा त्या सुमारास फ्रान्स, बल्गेरिया इत्यादी देशांमध्ये झालेल्या त्यांच्या दौर्‍यांमुळे, तिकडची म्युझियम्स, चित्रं पाहिल्यामुळे झालेला तो परिणाम असू शकतो. पण स्थिरचित्रांचं वेड असलेल्या आरांना नग्न स्त्री देहानेही झपाटून टाकलं होतं.

आराची न्यूड्स पुष्ट देहांच्या स्त्रियांची, आदिम लैंगिकता प्रकट करणारी. गुंतागुंतीच्या आकाररेषांमधून वळणं घेणारी, लैंगिकतेच्या छटा त्या वळणांआड कुठेतरी दडून बसलेल्या; पण तरीही ही लैंगिकताही सर्व शक्तीनिशी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी. बघणार्‍यांना त्या स्त्रिया जणू स्वत:च्या खासगी अवकाशामध्ये प्रवेशण्याचं आमंत्रण करत आहेत. तरीही एक तटस्थ, अलिप्त आविर्भावाचा विरोधाभास असतो त्यांच्यात. त्यांचे चेहरे फारसे कधी दिसत नाहीत. बहुतेकदा त्या पाठमोर्‍याच असतात. शरीरशास्त्रही वास्तव नसतं. अर्थात, त्यांनी न्यूड्स कशी रंगवली हे महत्त्वाचं नाही, का रंगवली हेही महत्त्वाचं नाही. जी रंगवली ती न्यूड्स अस्वस्थ करणारी, ज्या सहज नैसर्गिकतेनं ती चित्राच्या वातावरणात मिसळून जातात ते विलक्षण वेगळं.

न्यूड्स आणि स्टीललाईफ यांची सरमिसळ इतकी की, कधी कधी टेबलावर एकमेकांशेजारी रचून ठेवलेल्या फुलदाण्यांच्या आकारातूनही न्यूड फॉर्म दिसतो. आरांच्या मते फुलांची रचना त्यांना स्त्रीदेहासारखी वाटे. न्यूडमधून फुलं आणि फुलांमधून न्यूड अशी ही सरमिसळ कदाचित त्यामुळेच. आरांच्या न्यूडपेक्षा त्याच्या अवतीभोवती पसरलेला गुलाबी लाल रंगच कित्येकदा जास्त सेक्शुअली पोटेन्ट वाटणारा. काळसर देहाची, लाल ओठांची एक अनाकर्षक अनावृत स्त्री आरांच्या एका चित्रात आहे. त्यातल्या त्या नग्न स्त्री देहापेक्षा नजर वेधून घेतात तिच्या एका बाजूला ठेवलेली निळ्या फुलदाणीतली पिवळी फुलं. नग्न देहाचा पाठमोरा बाक जवळच ठेवलेल्या फुलदाणीसारखा कमनीय.

आराच्या चित्रात न्यूड ज्या पद्धतीने स्टीललाईफचा एक भाग म्हणून येतं ते अजब. फुलदाण्यांतला निसर्ग आणि निसर्गातल्या फुलदाण्या. एकमेकांमध्ये मिसळणारा. एकमेकांमधून उसळणारा. सेक्शुअँलिटी नग्नतेतून न आणता ते आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंच्या रचनेतून, रंगांमधून, मधल्या अवकाशातून आणतात. फुलदाण्यांमधली फुलं कधी निळी, कधी पिवळी, कधी गवती, कधी लालर्जद, मागच्या काळ्या पार्श्‍वभूमीतून नाट्यपूर्णरीत्या उमलून येणारी पिवळी फुलं, नीलवर्णी देह असणार्‍या स्त्रीच्या डोक्यामागून पाठीमागे एखाद्या पांघरुणासारखा पसरलेला लाल पडदा आणि बाजूला फुलदाणी, तीसुद्धा निळीच. त्या फुलदाणीत फुलं नाहीत. दोन पोपटी, लांबसडक पानं आहेत. कमरेपासून नितंबापर्यंतच्या वक्ररेषेत मिसळून गेलेली फुलदाणीची कडा. उघड्या पायाचा गुडघा ज्यावर टेकवला आहे ती निळी उशी, डोक्याखालच्या हिरव्या रंगाचा अभ्रा आणि सभोवती पसरून राहिलेला पुन्हा एकदा तो व्हर्मिलिऑन. अंगावर येऊन अस्वस्थ करून सोडणारा. कधी अनावृत पाठीच्या पन्हाळीतून सळसळता व्हर्मिलिऑन दुपट्टा, बाजूच्याच फुलदाणीतली लालभडक जास्वंदीसारखी फुले. कमीत कमी रंग, ठळक देहरेषा, व्हर्मिलिऑनच्या अंगोपांगी उमटलेल्या मोहक छटा. आरांच्या न्यूड्स बिनधास्त असतात, आत्मविश्‍वासू असतात की त्यांना स्वत:च्या नग्नतेची काही पडलेलीच नसते हे अनेकदा कळत नाही. त्यांच्या पाठमोर्‍या नग्न स्त्रिया अत्यंत गूढ वाटतात.

आरांची सामोरी न्यूड्स अलैंगिक वाटतात. त्यात शारीरसौंदर्याचे रूढ निकषही नाहीत. नसांची, स्नायूंची स्पंदनं नाहीत, नग्न देहांमध्ये कमालीची स्थिरता आहे. देहांमध्ये स्पंदन निर्माण करतात ते रंग. मातकट ब्राऊन आणि पांढरा रंग कोणतीही लैंगिक स्पंदनंही निर्माण करण्यात असर्मथ ठरणारे रंग. ही न्यूड्स अस्वस्थ करून सोडतात. त्या देहांचा निश्‍चलपणा अस्वस्थ करून सोडतो.

आराची काही न्यूड्स मात्र खूप भडक. निळ्या रंगातला एक उघडा स्त्रीदेह, स्वत:च्या नग्नतेची अजिबातच तमा न बाळगणारा, त्या स्त्रीच्या तिरक्या नजरेतले हिंस्त्र भाव, चेहर्‍याभोवती विखुरलेले केस, सपकन वार करण्यासाठी सज्ज असलेला हातातला चाबूक. त्याची मानसकन्या रुखसाना म्हणते त्याप्रमाणे त्यांचं मूळ कदाचित त्याच्या लहानपणामध्ये दडलेलं आहे. सावत्र आईने केलेला छळ, त्यातून त्याने घरातून पळून जाणं, आईबद्दलचा तिरस्कार त्याच्या मनात कायम घर करून होता. वडिलांबद्दलही कधी प्रेम वाटू शकलं नाही कारण सावत्र आई त्यांच्यामुळे नशिबात आली. त्याच्या काही न्यूड्समधून दिसून येणारा अंगार, तिरस्कार, हिंस्त्रपणा त्याचंच रूप.

प्रोग्रेसिव्हच्या सहा शिलेदारांपैकी हुसेन आणि आरा दोघेही चित्रकलेच्या बाबतीत स्वयंशिक्षित. दोघेही लहान गावातून आलेले, सामान्य घरात जन्मलेले. लहान वयातच घर सोडून मुंबईत आलेले. इथे आल्यावर सुरुवातीचा स्ट्रगल, चित्रकलेच्या क्षेत्रातली धडपड दोघांनाही न चुकणारीच होती. प्रोग्रेसिव्ह ग्रुपमधले बाकी सगळे आपापला मार्ग शोधत परदेशात गेले आणि मुंबईत राहिले ते हुसेन आणि आरा. सुरुवातीचं इतकं सारखं नशीब असलेले हे दोघे. पण पुढच्या आयुष्यात मात्र दोघांची ललाटरेखा असामान्यपणे वेगळी झाली. हुसेनची दैवरेखा त्याच्या चित्रांमधल्या घोड्यांसारखी दौडत गेली आणि आराची दैवरेखा मात्र त्याच्या चित्रांमधल्या रेषेप्रमाणे तुटक, असमान, त्याचं नशीबही त्याच्या स्थिरचित्रांप्रमाणेच स्तब्ध, स्थिर. आरांचे मित्र, प्रसिद्ध पेंटर जहांगिर सबावाला म्हणतात, ‘आरा बुद्धीने नाही, हृदयाने काम करणारा चित्रकार होता.’