उत्सव अक्षररंगचा..

सरत्या वर्षाला निरोप.. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी.. हवेत सुखद गारवा, मोकळे आकाश, स्वच्छ चांदणे, सभोवताल आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट, पुरस्कारांबद्दलची उत्सुकता, मंचावर डोक्यावरील पदर नीट सावरत बसलेल्या ख्यातनाम गायिका किशोरी अमोणकर, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे तीन माजी अध्यक्ष श्रोत्यांमध्येही विविध क्षेत्रांतील दिग्गजांची हजेरी यामुळे शनिवारची संध्या चांगलीच अविस्मरणीय झाली. कधी हलके फुलके आणि खुमासदार विनोद तर कधी वैचारिक गांभीर्य, टाळ्यांच्या कडकडाटात मिळणारी श्रोत्यांची दाद अशा वातावरणात लोकमत वृत्तपत्र समूहाचा पहिला अक्षररंग पुरस्कार सोहळा सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयाच्या भव्य प्रांगणात रंगला. प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा ‘मनोहारी’योग जुळून आला. किशोरीताई आज गाणार नाहीत, हे रसिकांना चांगले ठाऊक होते, पण त्यांना बोलताना ऐकणे हाही तेवढाच श्रवणीय अनुभव होता. त्यांचा शब्द न शब्द श्रोते कान देऊन ऐकत होते. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांना एकाच वेळी, एकाच मंचावर बघण्याची आणि ऐकण्याची संधीही लोकमतने उपलब्ध करून दिली. साहित्यिकांचा मेळा असूनही खेळीमेळीचे वातावरण होते. सामान्य वाचकांना जी नावेही फारशी माहिती नव्हती, त्यांची ओळख तर झालीच, त्यांना ऐकताही आले. पुरस्कार विजेत्यांविषयी खुद्द आयोजकांनाही पूर्वकल्पना नसणे हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. याच उत्सुकतेमुळे कार्यक्रमादरम्यान पुरस्कार कुणाला मिळाले हे जाणून घेण्यासाठी फोनवरून विचारणा होत होती.

------------------------------------

हातून घडलेलं सुंदर, दैवी असलंच पाहिजे! -गानसरस्वती किशोरीताई अमोणकर...

कोणताही कलावंत हे केवळ माध्यम आहे. जे व्यक्त करायचं आहे, ते महत्त्वाचं आहे. कलावंताची निर्मिती ही सुंदर आणि दैवी असलीच पाहिजे, असे मत गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांनी व्यक्त केले.

लोकमतच्या तेराव्या वर्धापनदिनी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचा पहिला अक्षररंग पुरस्कार सोहळा सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयाच्या भव्य प्रांगणात शुक्रवारी रंगला. ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांना श्रीमती अमोणकर यांच्या हस्ते पहिला लोकमत अक्षररंग जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

काळी सुती साडी, रेखीव भरजरी काठ, डोक्यावरील पदर, त्यात दिसणारी मोहिनी सुरत आणि तेजस्वी मोहक मूर्ती.. असे गानसरस्वतीचे रूप. एरवी केवळ स्वरमंचावर आपल्या सूरवैभवाचा वर्षाव करताना रसिकांनी अनेकदा अनुभवले आहे. परंतु या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे शब्द त्यांच्याच मुखातून ऐकण्याचे भाग्य पुणेकर साहित्य प्रेमींना यानिमित्ताने लाभले.

किशोरीताईंनी अत्यंत विद्वत्तापूर्ण भाषण केले. द्वैत-अद्वैताच्या प्रक्रियेचा विषय त्यांनी अतिशय सोप्या आणि प्रवाही भाषेत उलगडून दाखविला.

काही न करि जे ती तुझी सेवा

काही नव्हेसी ते तुझे देवा

नेणिजे ते तुझे रूप जाणिजे तितुके

पाप गा देवा

स्तुती करणे हे तुझी निंदा

स्तुतीजोगा नव्हेसी गोविंदा

या संत ज्ञानेश्‍वरांच्या ओळींचा संदर्भ देऊन किशोरीताईंनी ज्ञानाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, कुठल्याही विषयात आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पर्यायाने आपण विषय होण्याचा प्रयत्न करतो. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा आपण ज्ञानमार्गात आहोत, असं म्हणता येईल. ‘विषय’ आणि ‘आपण’ हे द्वैत-अद्वैतात आणण्यासाठी आपण कळत-नकळत त्या विषयाची साधना करीत असतो. ती करता करता असा अनुभव येतो, की आपल्याला विषयाचे वेड आहे. माणूस विषयानुरूप होतो; तो स्वत:चा राहात नाही. अन् कालांतराने फक्त विषय तेवढा शिल्लक राहतो.

स्वत:च्या गाण्याविषयी किशोरीताई म्हणाल्या, कधी कधी मलाही गाताना कशाचं भान राहत नाही. मी ट्रान्समध्ये जाते (तंद्री लागते). गाणं झाल्यावर मी शिष्यांना विचारते, ‘कशी गायले? कसं वाटलं तुम्हाला माझं गाणं.. म्हणजे मी कशी गायले हे मला माहीत नाही. पण माझ्या अपरोक्ष जे काही माझ्या हातून गेलं ते सुंदर दैवी असलंच पाहिजे. तेच साहित्याच्या बाबतीतही लागू होतं. साहित्यातही असंच असलं पाहिजे.

संगीतालाही पुरस्कार द्यावा

अक्षररंग साहित्य पुरस्कारांबद्दल आनंद व्यक्त करताना किशोरीताई म्हणाल्या, माझ्या संगीताबद्दल बोलायचं म्हणजे मग लोकमतला संगीतालाही पुरस्कार द्यावा लागेल. त्यांनी द्यावा अशी अपेक्षा आहे. मी लोकमत परिवाराची ऋणी आहे. त्यांनी माझ्याकडे मागितलं, तसं मीही त्यांच्याकडे मागायचे शिल्लक आहे. ते असं की प्रत्येक वेळी त्यांना माझी आठवण व्हावी.

------------------------------------

भाषा तयार करणे हे कादंबरीकारापुढे मोठे आव्हान-श्याम मनोहर...

वाचनप्रक्रिया या विषयावर मी माझे मत मांडणार आहे. कादंबरीत घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि वर्णने असतात. कल्पकता ही आपल्याला मिळालेली शक्ती आहे. माणसाचे जगणे हे घटना आणि प्रसंग यातून उघड होत असते. घटनेचा अर्थ लावला तर त्या वेळच्या जगण्याचा अर्थ लावता येतो. मग सर्व घटनांचा अर्थ कसा लावणार? सर्व घटना एकत्र येणं म्हणजे सबंध जीवन होय. जगणं हे एकेका प्रसंगातून उलगडत जातं. सबंध जीवन शोधण्यासाठी वाचकाला कुतुहल हा पैलू वापरायचा असतो. कादंबरी वाचताना वाचकांनी सृष्टीचा अर्थ काय, जीवनाचा अर्थ काय, हेही कुतुहल ठेवायचं असतं.

मराठी भाषेबद्दल माझी थोडी नाराजी आहे. काही वाक्प्रयोग अजून निश्‍चित ठरलेले नाहीत. कुणी मदत केली तर आपण थँक्स म्हणतो, धन्यवाद म्हणत नाही. शिवाय वर्णन करायचे असेल तर मराठी कमी पडते का अशी शंका येते.

सोपी वाक्ये करणे, ‘व ’, ‘आणि’ ही उभयान्वयी अव्यये जोडणे याकडे मराठीचा कल आहे. अशी वाक्ये केली तर वर्णने भावनाशील होण्याची शक्यता असते. वर्णने जशीच्या तशी करायची आणि निरीक्षण करणार्‍याची वैशिट्येही त्यात घालायची. यासाठी भाषेचा आनंद घेता येईल,

अशी भाषा निर्माण करावी लागेल. हे

भाषा तयार करण्याचे सर्वांत मोठे

आव्हान कादंबरीकारापुढे आहे.

जगताना घटनांच्या अनुभवांनंतर भावना व्यक्तकरता येतात.

कादंबरी, कथा वाचताना आपण

घटना वाचतो, मग विचार येतात.

वाचकाला कृती करण्याची संधी

नसते. त्यामुळे कल्पकता, बुद्धिमत्ता,

भावना जन्मते आणि नष्ट होते. वाचकाला तत्वज्ञानाचं मन जागं ठेवावं लागते.

कारण त्याला जीवनाचा आनंद

घ्यायचा असतो. यासाठी हे काही घटक जोपासले पाहिजेत.

आता व्यावहारिक मुद्दे, ‘गाव तेथे एसटी’ या धर्तीवर प्रत्येक गावात सुसज्ज आणि मोफत वाचनालय असावे. शेजारी साक्षरतेचे काम सुरू असावे. तिथे जावेसे वाटले पाहिजे. खरे तर हे आधीच व्हायला पाहिजे होते. का नाही झालं कुणास ठाऊक ? सरकार, उद्योगपती, आमदार, खासदारांनी ते करावे.

शासनाने लोकमतचा आदर्श घ्यावा

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अक्षररंग साहित्यातील कामगिरीसाठी दिलेल्या या पुरस्कारांचा कर (टीडीएस) ‘लोकमत’च भरणार असल्याचे मला सांगण्यात आले. साहित्यिकांना तो द्यावा लागणार नाही. राज्य सरकारही अनेक वाड्मयीन पुरस्कार देत असते. पण त्यात कर कापून रक्कम दिली जाते. शासनाने लोकमतचा आदर्श घ्यावा.

------------------------------------

‘लोकमत’चा सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग महत्वाचा : डॉ. अरूणा ढेरे

‘या पुरस्कारांच्या निमित्ताने अतिशय स्वागतार्ह अशा घटनेत आम्हाला सगळ्याना सामील करून घेतले याबददल मी ‘लोकमत’चे आभार मानते. राजकीय, सामाजिकच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही आपला सहभाग असावा ही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे.आजच्या काळात माध्यमांची भूमिका सर्वच बाबतीत महत्वाची ठरत असताना या वृत्तपत्राने अशी सकारात्मक सुरूवात करावी हे मला विशेष वाटते. मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. या वर्षातल्या गुणवत्तापूर्ण लेखनाचा नकाशाच या पुरस्कारांच्या निमित्ताने समोर आला. परीक्षक म्हणून काम करताना कलाकृतीचा अनेक बाजूंनी विचार होतो. आपल्या अभिरूचीच्या प्रवासात पुस्तकांची जागा ठरवणे,लेखनवृत्तीचा विचार करणे हे महत्वाचे ठरते. ते या निमित्ताने झाले. वाचकांचे सहकार्यही महत्वाचे ठरले. आमच्या मतांच्या बरोबरच त्यांचा कौलही या पुरस्कारांसाठी विचारात घेतला गेला आहे. किशोरीताईंच्या उपस्थितीत हा समारंभ होत आहे याचा आनंद तुमच्याइतकाच आम्हालाही आहे. श्याम मनोहराना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबददलही आनंद आहे. ‘लोकमत’चे पुन्हा एकदा आभार मानते.

------------------------------------

तिरस्काराच्या वातावरणात या पुरस्काराचे महत्त्व अधिक : अशोक नायगावकर

विविध आकृतीबंधातील पुरस्कार देणे हे अत्यंत कौतुकाचे आहे. हल्ली लेखन, साहित्य बाजूला पडल्यासारखे किंवा नवृत्तीनंतर व्यासंग करण्याची गोष्ट असल्यासारखी स्थिती झाली आहे. तरुण पिढी तर साहित्याकडे वळतच नाही. नरेंद्र चपळगावकर यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले होते, पुरस्कारासाठी लिहिले जात नाही. परंतु त्यामुळे पुस्तक अनेक ठिकाणी पोहोचते. लोकमतने हा पुरस्कार यापुढे अधिक वाढवावा. यात अजून वेगवेगळ्या आकृतीबंधांचा समावेश करून घ्यावा. या पुरस्काराला एवढे मोठे करावे की, जगभरातील लेखकांना आपले पुस्तक या पुरस्काराचा भाग ठरावे असे वाटावे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेसाठी पुस्तक मागवले गेले नसून पुस्तके वाचून त्याचे परीक्षण करून स्पर्धेत स्वत:हून सामावून घेण्यात आले. यावरूनच १0 वर्षात हा पुरस्कार मराठीतील मानाचा पुरस्कार ठरेल असा संकेत मिळतो. आज बाहेरचे वातावरण तिरस्कारमय असताना येथे हा पुरस्कार सोहळा होत आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याच्या काळात बातम्या वाचून, ऐकून आपणच आत्महत्या करावी असे वाटत असताना मात्र अशा आनंददायी वातावरणात पुरस्कार वितरण होते , हा आनंद असाच सभोवताली पसरावा.

------------------------------------

पुरस्कारांसाठी निवडीसंदर्भात आम्हा परीक्षकांमध्ये कसलेही मतभेद झाले नाहीत. आम्हा तिघांचेही सूर जुळलेले होते. असे अनकेदा होत नाही. निष्पक्ष आणि स्वच्छ जाणीवेतून ही निवड करण्यात आली. वाचकांनीही चांगला प्रतिसाद दिला. जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्या नावावर आमचे एकमत होतेच पण ते नाव समोर येताच प्रकट झाले. मनोहर ३२ वर्षांपेक्षा जास्त काळ लिहीत आहेत. त्यांचं लेखन वेगळ्या प्रकारचं आहे. त्याचे अनुकरण होऊ शकत नाही. लेखनाचा आकृतीबंध आणि विचार महत्त्वाचा असतो. मनोहरांनी अवकाश आणि काळाचा उत्तम शोध घेतला आहे. माणसाच्या मनातील द्वंद्व त्यांनी प्रतीकात्मक रीतीने मांडले आहे, हेच त्यांचं वैशिष्ट्य होय. एक वर्ग दुसर्‍या वर्गाकडे कसे बघतो, हे त्यांच्या कथानकातून दिसते. जगताना कुटुंबात, लोकांमध्ये कला, ज्ञान, विज्ञान, अध्यात्म यांविषयी काही घडते का, असे प्रश्न ते निर्माण करतात आणि सामान्य माणूस यापासून कसा वेगळा राहतो, हे ते दाखवितात. त्यांचा विचार करण्याचा पल्ला विलक्षण आहे. सामान्यांना भेडसावणारे प्रश्न खोलात जाऊन ते व्यक्त करतात. वसाहत आणि जागतिकीकरण यामध्ये भरडल्या जाणार्‍या सामान्य माणसाचे चित्रण त्यात आहे. त्यांनी अवकाश शोधला आहे

- वसंत आबाजी डहाके

------------------------------------

दोन वतरुळे एकत्र

शाम मनोहर यांचे अंतरवर्तुळातले साहित्य आहे. ते लोकवतरुळातले नाहीत, लोकप्रिय नाहीत. तर ‘लोकमत’ हे लोकपीठ आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. ‘लोकमत’ आणि शाम मनोहरांचे अंतरवतरुळ ही दोन वतरुळे पुरस्कार रुपाने एकत्र आली आहेत. ही प्रयोगशिलतेमुळे मनोहरांचे साहित्य समाजापर्यंत जाईल आणि समाज मनोहरांपर्यंत पोहोचेल. साहित्य क्षेत्रात पुरस्कार सुरू केल्याबद्दल या लोकपिठाला मी धन्यवाद देतो.

-डॉ. द. भि. कुलकर्णी, (माजी संमेलनाध्यक्ष)

------------------------------------

टीव्हीमुळे कलेचे कलेवर

आजकाल साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हरवला आहे. टीव्हीमुळे

कलांचं कलेवर होत आहे. टीव्हीच्या गडबडीमुळे आपल्याला वेळ नाही. साहित्यिकानं एकट्याला घेऊन फिरावं लागतं. त्यातून साहित्याचं

स्फूरण चढत असतं. कलेच्या नावावर कलेवर जन्माला घातलं जात आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेल्या या पुरस्कारांमुळे किमान यापुढे तरी आपण साहित्याच्या स्वरूपाकडे, सौंदर्याकडे वळू, अशी अपेक्षा करायला

हरकत नाही.

- डॉ. आनंद यादव, (माजी संमेलनाध्यक्ष)

------------------------------------

या पुरस्काराने वाढली जबाबदारी

‘माणूस’ या सूत्राभोवती लेखन करतो आहे. डॉक्टरी व्यवसायात असल्याने अनेकांची सुख, दु:ख जवळून

बघता आली. लेखनाद्वारेच अनेकांशी सलगी झाली.

याच नातेसंबंधातून अनेकदा गुंता सोडविण्याचा प्रयत्न

झाला. एखाद्या विषय समोर आला तेव्हा त्यात खोलवर जाऊन विचार केल्यावर भयानकता दिसून आली. त्यावेळी कळले सेवा आणि वसा यात काय आहे ते. ‘लोकमत’चा पुरस्कार मिळाल्याचा आनंद काही वेगळा आहे. या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. असे

पुरस्कार पायाला बळ देतात. साहित्याच्या वारीत एकत्रित चालल्याशिवाय साहित्याचा आनंद घेता येणार नाही. विणेच्या रुपाने हाती आलेल्या या पुरस्काराचा आदर ठेवीन.

- डॉ. राजेंद्र माने, (कथा)

------------------------------------

कोपर्‍यातला माणसाला दिले तुम्ही नाव..

गावकुसाबाहेरच्या माझ्या समाजाचं दु:ख वेशीवर टांगण्याचा

प्रयत्न मी केला. मला माझ्या बापानं, मायेनं घडविलं. बाप म्हणायचा, रुळलेल्या वाटेनं जाऊ नको. पडशील तरी नव्या वाटेनं जा. नोकरी लागली तर ठीक; नाहीतर सर्व कामे करता आली पाहिजे.

मला शेतीची सर्व कामे येतात. हमाली येते. एक क्विंटलचं पोतं

अलगद उचलता येते. लोक म्हणायचे, ‘‘एवढं बळ कुठून आलं?’’ मी म्हणायचो, ‘‘माझ्या आईच्या दूधातून मला बळ मिळालं. रा. गो. काळेसर, मंगेशराव काळे यांनी मला वाचनाचं वेड लावलं. मी एका कोपर्‍यात पडलेलो होतो पण सतीश काळसेकर यांनी कादंबरी प्रसिद्ध केली, त्यांचा मी ऋणी आहे. कादंबरीला लोकमतने लोकांसमोर आणले त्यांचाही ऋणी आहे.

- रामराव झुंजारे (कादंबरी)

------------------------------------

मराठीतील माझ्या पहिल्याच प्रयत्नाला दाद

मी पहिल्यांदाच मराठीत लिहायचा प्रयत्न केला आणि

त्याला पारितोषिक मिळाले. या पुस्तकाला प्रेरणा मिळाली

ती एका साध्याच प्रसंगाने. परभणी येथील प्राचार्य रामदास डांगे एकदा माझ्याकडे त्यांच्या आहेर आणि परदेशी या दोन स्नेह्याना घेऊन आले. त्यांच्या इतिहास विभागाकरीता त्यांना सुफी तत्वज्ञानावर लेख हवा होता. मी होकार दिला. लिहायला लागल्यावर दोन-चार पानात

हे तत्वज्ञान बसवणे अवघड होते. डांगे म्हणाले, सविस्तर लिहीत आहात तर मग ग्रंथच लिहा. प्रा. मुसा बागवान, प्रा. अनिल सहस्त्रबुध्दे यांनीही मी यासाठी प्रोत्साहनच दिले. एक महिन्याच्या प्रकल्पाला पूर्ण होताना तीन वर्षे लागली. ग्रंथ प्रकाशनालाही सहा वर्षे लागली.

- डॉ.आझम मुहम्मद, (वैचारिक)

------------------------------------

असा रंगला सोहळा...

‘अक्षररंग साहित्य पुरस्कार’ वितरण सोहळ्याची सुरुवात गानसरस्वती किशोरी अमोणकर आणि ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. त्यानंतर अवधुत गांधी आणि सहकार्‍यांनी वारकरी परंपरेत गणेश वंदना आणि सरस्वतीस्तवन सादर केले.

- स्वागतपर मनोगत व्यक्त करताना ‘लोकमत’ पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर म्हणाले, साहित्य क्षेत्रात कार्यकतृत्व गाजविणार्‍या, मोलाचे योगदान देणार्‍या सारस्वतांचा हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुरस्काराचा पहिला सोहळा आयोजित करण्याचा मान पुणे आवृत्तीला मिळाला ही आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. ‘लोकमत’ आणि सर्वसामान्यांचे नाते उलगडताना ते म्हणाले,‘‘लोकमत’ हे संख्येने पहिल्या क्रमांकावर आहे, असे नाही तर सर्वसामान्यांशी नाते जोडण्यातही पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांची दु:खे दूर करण्याचा ‘लोकमत’ने कायम प्रयत्न केला आहे.’’ भविष्यातील वाटचालीत सर्वांचे प्रेम, आशीर्वाद मिळत राहिल असा विश्‍वास व्यक्त केला.

- गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचा ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन तर मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी पैठणी देऊन सत्कार केला.

- पुरस्कारामागची भूमिका विषद करताना मुख्य संपादक विजय कुवळेकर म्हणाले, ‘‘हा सोहळा दोन गोष्टींसाठी आनंदाचा क्षण आहे. पहिला म्हणजे पुरस्काराचा हा प्रारंभाचा कार्यक्रम आहे. तर दुसरा म्हणजे सारस्वतांचा गौरव गानसरस्वतींच्या हस्ते होत आहे. तर उपस्थितांचा आशीर्वादही आणखी एक जमेची बाजू आहे मराठी भाषेविषयी महान साहित्यिक कुसुमाग्रज यांनी २0 वर्षांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. मराठी भाषेला संजीवनी देण्यासाठी, साहित्यिकांना प्रोत्साहनात्मक उपक्रम ‘लोकमत’ने हाती घेतला आहे. सारस्वतांचा सन्मान करणारे देशातले हे पहिले वर्तमानत्र आहे, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो . खर्‍या अर्थाने हे ऐतिहासिक क्षण आहेत. भविष्यात या पुरस्काराला रंग,रूप, आकार येईल. तो साहित्य, संस्कृती क्षेत्रात ऐतिहासिक ठरेल. साहित्यासाठी आयुष्यभर योगदान देणार्‍या साहित्यिकाला एक लाखाचा मानाचा पुरस्कार देऊन मानाचा मुजरा करण्यात येत आहे. त्या-त्या वर्षात प्रसिद्ध होणार्‍या कलाकृतींना पुरस्कार देण्यात येत आहेत. चार वाड्मय पुरस्कार निवडीसाठी नामवंत परिक्षक मंडळी मिळाली. पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी लेखक, वाचकांच्या प्रतिक्रिया मागविल्या. चारही विभागात नामांकन पद्धतीने पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. त्यावेळी लोकमतची भूमिका केवळ ‘आम्ही तो हमाल भारवाही’ अशी होती. जीवनगौरव पुरस्काराचे पहिले मानकरी श्याम मनोहर ठरले. साहित्याच्या क्षेत्रात ते मळलेल्या वाटेने गेले नाहीत तर त्यांनी स्वत:ची वाट शोधली. त्यांनी कुणाचेही अनुकरण केले नाही. स्वत:च्या निर्मितीत मश्गुल राहिले. विचारप्रवृत्त करायला लावणार्‍या कलाकृती दिल्या. ‘एकला चलोरे’ अशी भूमिका स्वीकारली.

- गानसरस्वती अमोणकर यांचा गौरव करताना कुवळेकर म्हणाले, ‘‘तपश्‍चर्या म्हणजे काय हे त्याच्याकडे बघून कळते. स्वरांची

पूजा बांधता बांधता त्याच तपस्वी झाल्या. भक्तालाच

देवत्त्व येणार्‍या घटना आपल्या संस्कृतीत नव्या नाहीत. अशा तपस्वी सरस्वतींच्या, अलौकिक स्वरांच्या हस्ते प्रतिभावंतांचा गौरव होत आहे आणि रसिकांच्या साक्षीने ही ऐतिहासिक गोष्ट घडत आहे. ’’

- समूह संपादक दिनकर रायकर यांनी डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा तर ‘लोकमत’ पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर यांनी प्रा. वसंत आबाजी डहाके यांचा सत्कार केला. उपमहाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी अशोक नायगावकर तर सहसंपादक प्रदीप निफाडकर यांनी अरूणा ढेरे यांचा सत्कार केला.

- प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत निवेदन केले.