ऊस आंदोलनाचा भडका!

दोन बळी; अनेक ठिकाणी बस पेटवल्या

कोल्हापूर / सांगली / पुणे।

दि. १२ (लोकमत न्यूज नेटवर्क)

ऐन दिवाळीच्या तोंडावर पुकारण्यात आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदरवाढीच्या आंदालनाचा सोमवारी भडका उडाला. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या अटकेची वार्ता पसरताच संतप्त कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले. त्यात दोघांचा बळी गेला. राज्य सरकार मात्र उसाचा दर कारखान्यांनीच ठरवावा, या भूमिकेवर ठाम आहे.

या वर्षीच्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन ३ हजार भाव द्यावा, या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ संघटनेचे सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या कारखानदारांच्या बैठकीत पहिली उचल २,३00 रुपये जाहीर केली; मात्र खा. शेट्टी यांनी हा दर अमान्य केला. ऊसदराबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारला मुदत देण्यात आल्यानंतरही ऊसदराची कोंडी न फुटल्यामुळे इंदापूर येथील कर्मयोगी कारखान्यावर ठिय्या मारून बसलेल्या खा. शेट्टी यांनी काल रात्री राज्यभरात ‘चक्का जाम’चे आवाहन केले होते.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज वालचंद नगरला येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी खा. शेट्टी व ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना पहाटे इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहावर अटक करून अज्ञातस्थळी हलविले. त्यानंतर आंदोलनाचा भडका उडाला.

कोल्हापुरात जाळपोळ

‘स्वाभिमानी’ हिंसक

- पहिली ठिणगी लोणी देवकरमध्ये पडली. ५00 कार्यकर्त्यांनी ‘बाश्री-पुणे’ बस पेटवून दिली. ठिकठिकाणी रास्ता रोको झाले.

- प. महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांतील राज्य मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. कोल्हापूरपासून सोलापूरपर्यंत याचे लोण पसरले.

- राजू शेट्टींना सोडले : खा. राजू शेट्टी यांची सायंकाळी सुटका करण्यात आली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

दोघांचा बळी

- पुणे-सोलापूर महामार्गावर वनगळी येथे कुंडलिक कोकाटे (२६) या कार्यकर्त्याचा वाळूच्या ट्रकखाली

मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात वसगडे (ता. पलूस) पोलिसांच्या गोळीबारात चंद्रकांत शिवाजी यांचा बळी गेला.

- 20 एसटी जाळल्या

- 10 एसटीची तोडफोड