एटीएमची लक्ष भरारी...

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १३ - कोणत्याही वेळी आपल्याला खात्यावरील रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणा-या एटीएमच्या संख्येने आता लाखांचा आकडा ओलांडला आहे. यंदाच्या ऑक्टोबरअखेरपर्यंत देशात अशा प्रकारच्या यंत्रांची संख्या लाखांपार गेल्याचे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने म्हटले आहे. ही संख्या १ लाख ४ हजार ५०० असल्याचे या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

किरकोळ देयकांवर निगराणी करण्यासाठी ही संघटना शिखर संघटना म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य बँकांनी पुरस्कृत केली आहे. यात सर्वाधिक एटीएम ही भारतीय स्टेट बँकेची आहेत. ही बँक आणि तिच्याशी संलग्न बँकांची मिळून ६१ हजार ५०० एटीएम असून ही टक्केवारी ५९टक्के इतकी होते.

भारतात एटीएमच्या उभारणीला साधारणतः ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरुवात झाली. बँकांच्या शाखांतून रक्कम काढण्यासाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी सुरू झालेल्या एटीएमचा वापर आज अनेक बँका फंड ट्रान्स्फर, सेवाभावी संस्थांना देणग्या देण्यासाठी, चेक आणि रोख रक्कम जमा करण्यासाठीही करत आहेत.

खासगी बँका तसेच विदेशी बँकांच्या एकंदर एटीएमची संख्या ४१ हजार ८०० इतकी असून त्यांची टक्केवारी ४० इतकी आहे. सहकारी बँका आणि विभागीय ग्रामीण बँकांच्या एटीएमची संख्या ११५० इतकी आहे.

महिनाभरात या मशीनमध्ये साधारणतः २० कोटी व्यवहार होतात. त्यातील ७५ टक्के व्यवहार हे रोख रक्कम काढण्याचे आहेत. बँकांमधून काढल्या जाणा-या रक्कमेची सरासरी काढली तर ती ३ हजार ३०० रुपये इतकी होते.