गडकरींचा राजीनामा

- पक्षांतर्गत विरोधानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले

नवी दिल्ली। दि. २२ (लोकमत न्यूज नेटवर्क)

सलग दुसर्‍यांदा पक्षाध्यक्षपद मिळविण्यासाठी निवडणूक लढविण्यापेक्षा पदावरून पायउतार होण्याचा मार्ग नितीन गडकरी यांनी आज अनपेक्षितरीत्या स्वीकारला. पक्षांतर्गत विरोध लक्षात घेऊन गडकरी यांनी राजीनामा दिल्यावर भाजपात हालचालींना विलक्षण वेग आला असून, नवे अध्यक्ष म्हणून राजनाथ सिंह यांच्या नावावर सहमती होण्याची चिन्हे आहेत.

रा. स्व. संघाच्या भरभक्कम पाठबळामुळे गडकरी सलग दुसर्‍यांदा भाजपाचे अध्यक्ष होण्याची सारी तयारी पूर्ण झाली होती; पण आज संध्याकाळच्या सुमारास अचानक पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी उमेदवारी अर्जाची मागणी केल्याचे वृत्त थडकले. गडकरींसाठी लालकृष्ण अडवाणी यांचे मन वळविण्यात रा. स्व.संघाला अपयश आले.

तत्पूर्वी, मुंबईत गडकरी व अडवाणी यांच्यात जवळपास १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. या वेळी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशीही उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी अरुण जेटली यांच्या दिल्लीतील निवासस्थानी संभाव्य नावांची चर्चा सुरू होती. अडवाणींचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट झाल्यावर गडकरी यांनी रात्री रिंगणातून माघार घेतली.

----------------------------

मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कोणतेही गैरकृत्य केलेले नाही; तरीही संपुआ सरकारमधील लोकांनी माझ्याबद्दल अपप्रचार केला. यामुळे मी आणि माझा पक्ष प्रचंड व्यथित झालो आहे. या सर्व प्रकाराचा माझ्या पक्षाला कोणत्याही पद्धतीने फटका बसू नये, अशी माझी इच्छा आहे. यामुळे अध्यक्षपदाची दुसरी टर्म न स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. मला वेळोवेळी सहकार्य केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो. मी यापुढे पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन.

- नितीन गडकरी

----------------------------

- गडकरी दिल्लीहून सकाळी ९ वाजता मुंबईत.

- महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार तसेच अनेक नेते भेटले.

- पूर्ती कंपनीत गुंतवणूक केलेल्या कंपन्यांच्या ११ ठिकाणच्या कार्यालयांवर आयटी छापे.

- दिल्लीतून प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि शाहनवाज हुसेन यांनी आयकर कारवाईवरून काँग्रेसवर कठोर टीका केली.

- एका गुप्त बैठकीनंतर गडकरी उत्तनला रवाना झाले. तेथील कार्यक्रमात अडवाणींसोबत एकाच व्यासपीठावर होते.

- दिल्लीत सायंकाळी चार वाजता यशवंत सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज व मतदार यादी घेतली.

- संघाचे राम लाल सक्रिय झाले. त्यांच्या पुढाकाराने राजनाथ सिंह यांच्या नावावर मतैक्य झाले.

- अडवाणी, गडकरी व संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची बंदद्वार बैठक झाली.

- कार्यक्रमानंतर दिल्लीला परतताना अडवाणी आणि गडकरी वेगवेगळे गेले.

- दिल्लीला जाण्या-पूर्वीच गडकरींनी राजीनाम्याची घोषणा केली.

----------------------------

आयटीचा दणका?

गडकरी यांनी एक फेब्रुवारी रोजी नागपूर प्राप्तीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसमोर उपस्थित राहावे, असा आदेश बजावण्यात आला असतानाच आज त्यांच्या पूर्ती कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांची प्रत्यक्ष चौकशी आयकर विभागाने सुरू केली. विद्याविहार, भांडुपसह मुंबईतल्या ११ ठिकाणी ही कारवाई पार पडली. पूर्तीत गुंतवणूक करणार्‍या कंपन्या अस्तित्वात आहेत का, दिलेल्या पत्त्यांवर त्यांची कार्यालये आहेत का, या कंपन्यांचे नेमके काम काय आहे, त्यांची उलाढाल किती आहे, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याचे आयकर अधिकार्‍याने सांगितले.

----------------------------

पुन्हा राजनाथ?

गडकरींचा पायउतार होण्याचा इरादा स्पष्ट होताच नव्या अध्यक्षासाठी नावांची चाचपणी आणि मोर्चेबांधणी वेगाने सुरू झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आडवाणी यांनी यशवंत सिन्हा यांचे नाव सुचविले. पण, संघ परिवाराकडून राजनाथ सिंह यांच्या नावाला पाठिंबा मिळाला. अखेरीस गडकरींच्या नेतृत्वाला आव्हान देणार्‍या सिन्हा यांच्यापेक्षा यापूर्वी दोन वेळा अध्यक्षपद भूषविलेल्या सिंह यांच्या नावावर सहमती होण्याची लक्षणे रात्री उशिरा स्पष्ट झाली. किंबहुना उद्या स्वत: गडकरीच अध्यक्षपदासाठी सिंह नाव सुचवतील, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

----------------------------

पूर्वपीठिका : या ६२ वर्षीय नेत्याचे मूलत: उत्तर प्रदेश हे राजकीय कार्यक्षेत्र. १९९७ मध्ये ते उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष झाले. रालोआच्या सत्ताकाळात ९९ साली ते केंद्रात भूपृष्ठ वाहतूकमंत्री झाले. २00५ साली अडवाणी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकमताने अध्यक्षपदी निवड झालेल्या सिंह यांना २00६ साली पक्षाने पुन्हा बिनविरोध अध्यक्ष केले.