गडचिरोलीमध्ये तीन नक्षलींना अटक

ऑनलाइन टीम

नागपूर, दि. ८ - गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीसांनी गेल्या तीन दिवसांमध्ये तीन नक्षलींना अटक केली असून यामध्ये एका दलम कमांडरचा समावेश आहे. रजिता उर्फ सुकरी वेलादी (वय ३५), सुमन उर्फ सुमित्रा लेखामी (वय २३) व तुंगे हेदो (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रजिता ही नक्षल दलमची कमांडर असल्याची माहिती गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहासंचालक रविंद्र कदम यांनी दिली.

पोलीसांच्या नक्षलविरोधी पथकाने रजिताला चार्विदंड या गावातून अटक केली असून आजारी असलेली रजिता येथे वैद्यकीय उपचारांसाठी आली होती. पोलीसांवर हल्ला करण्यापासून ते खून, खुनाचा प्रयत्न, जाळपोळ अशा स्वरुपाचे सुमारे २५ गुन्हे रजितावर दाखल आहेत. अशोक रेड्डी उर्फ मुरली या दलमच्या कमांडरची रजिता पत्नी आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक सध्या आंध्र प्रदेश पोलीसांच्या ताब्यात आहे. सुमन व तुंगे या अटक केलेल्या अन्य दोन नक्षलींच्या नावावर अनुक्रमे १२ व ४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.