गुरूला ‘अर्पण’ करणार नृत्यांजली

वृषाली चितळे सादर करणार भरतनाट्यमचे विविध नृत्यप्रकार

नागपूर। दि. २२ (प्रतिनिधी)

महाराष्ट्रात भरतनाट्यमच्या प्रसारात मोलाचा वाटा उचलणारे गुरू आचार्य पार्वतीकुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उपराजधानीत ‘अर्पण’ या विशेष नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. उपराजधानीतील उदयोन्मुख कलाकार व त्यांची शिष्या वृषाली चितळे यावेळी भरतनाट्यमचे विविध नृत्यप्रकार सादर करून आचार्यांंना नृत्यांजली अर्पण करणार आहे. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात याचे बुधवारी आयोजन करण्यात आले आहे. लहानपणापासूनच भरतनाट्यममध्ये रुची असणार्‍या वृषाली चितळेने बारावीत तिसरे मेरिट मिळवूनदेखील शास्त्रीय नृत्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. याकरिता तिने पुणे येथे जाऊन नृत्याचे धडे घेतले. पुणे येथे राहूनच तिने र्जमन भाषेची पदवी संपादन केली व याचदरम्यान डॉ.सुचेता चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षे नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. यासोबतच गेल्या ४ वर्षांंपासून ती भारतीय शास्त्रीय संगीताचेदेखील धडे गिरवित आहे. तिने भरतनाट्ममध्ये ‘मध्यमा पूर्ण’ केले आहे. सध्या ती गुरू सुचेता ताई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठातून ‘मास्टर्स इन डान्स’ करत आहे.

वृषालीने आजपर्यंंत अनेक मोठमोठय़ा कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली आहे. काही दिवसांपूर्वीच र्जमनीतदेखील तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात भरतनाट्यममध्ये ‘पीएच.डी.’ करण्याचे स्वप्न पाहणार्‍या वृषालीने ओडिसी, मोहिनीअट्टम् आणि पाश्‍चिमात्य नृत्यातदेखील प्राविण्य मिळविले आहे हे विशेष. ‘अर्पण’ या कार्यक्रमाद्वारे स्वर्गीय गुरू आचार्य पार्वतीकुमार यांना नृत्याद्वारे श्रद्धांजली देण्याचा लहानसा प्रयत्न आहे अशा भावना तिने व्यक्त केल्या.