गैरव्यवहाराची चौकशी करा

अलिबाग। दि. ७ (विशेष प्रतिनिधी)

कुरुळ ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना गैरव्यवहार झाला असून, या गैरव्यवहाराची त्वरित चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे के ली आहे.

कुरुळ पेयजल योजनेच्या चौकशीच्या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अलिबाग तालुका उपाध्यक्ष धनंजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रणय पाटील, चेंढरे विभागीय अध्यक्ष साईनाथ वेळे व देवव्रत पाटील, राकेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पेयजल योजनेअंतर्गत कुरुळ हद्दीत पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. या टाक्या उभारताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असून, कोणतेही निकष पाळण्यात येत नसल्याची तक्रार धनंजय म्हात्रे यांनी दि. १ नोव्हेंबर रोजी कुरुळ ग्रामपंचायतीत केली होती. या तक्रारीनंतर उद्यमनगर येथे उभारण्यात येणार्‍या टाकीचा झुकलेला एक कॉलम ठेकदाराने तोडला. ठेकेदाराच्या या कृतीमुळे टाकीच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे मनसेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कुरुळ पेयजल योजनेची त्वरित सखोल चौकशी करावी व या योजनेच्या गैरव्यवहारातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.