घाटकोपरला ट्रक दुकानात घुसला

मुंबई। दि. १६ (प्रतिनिधी)- ब्रेकफेल झालेला ट्रक वाहनांना धडक देत थेट दुकानात घुसल्याने बळीराम लवथे (५५), मारुती राणे (७६) हे दोघे जण ठार तर पाच पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली.

विमल पालगडे, हनुमंत नटके, बद्रिनाथ गोरडे, रोहिदास पाचपुते गंभीर जखमी आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील जलाराम मंदिराजवळ दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुलुंडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. परिणामी, चालकाने दोन रिक्षा, एक कार या वाहनांना धडक देत रस्त्यालगत असलेल्या एका सलूनमध्ये ट्रक घुसवला. संतप्त रहिवाशांनी केलेल्या दगडफेकीत घाबरलेल्या ट्रक चालकाने आपल जीव वाचविण्यासाठी घटनास्थळाहून पळ काढला.