चकली

चकलीची भाजणी दळून आणली की, घरभर एक सुगंध पसरतो. भाजणीचा खमंग वास भूक चाळवत राहतो. चकल्या पाडायल्या बसल्यानंतर त्यांची चक्र एकसारखी यावी, यासाठी घरातल्या स्त्रीचा हात सुबकतेनं फिरत असतो. चकल्या पाडून झाल्यावर त्या न हसता तांबूस रंगावर तळल्या गेल्या की, मगच ‘तिचा’ जीव भांड्यात पडतो. मग घरातली पोरंबाळं तिच्याभोवती जमा होतात.

सोर्‍यात पिठाचा मोठ्ठा गोळा घालून भलीमोठ्ठी चकली एकदाही मधे न तुटता पाडण्याची चढाओढ लागते. आपल्या प्रत्येकीच्या

घरचं हे चित्र आहे. या दिवाळीत भाजणीबरोबरच तांदळाची, कणकेची चकली करून बघितली तर?

चकलीची भाजणी

प्रकार-१

साहित्य- ५00 ग्रॅम तांदूळ, २५0 ग्रॅम हरभरा डाळ, १२५ ग्रॅम उडीद डाळ, १२५ ग्रॅम मुगाची डाळ, एक वाटी जिरे, एक वाटी धणे.

प्रकार-२

साहित्य- ६00 ग्रॅम तांदूळ, २00 ग्रॅम हरभरा डाळ, १५0 ग्रॅम उडीद डाळ, ७५ ग्रॅम मुगाची डाळ, एक वाटी जिरे, एक वाटी धणे.

प्रकार -३

साहित्य - चार वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, दोन वाटी पंढरपुरी डाळ्या, अर्धी वाटी जिरे, एक वाटी पोहे, दोन टे. स्पू. मेथी दाणे.

प्रकार-४

साहित्य- ५00 ग्रॅम ज्वारी, २५0 ग्रॅम हरभरा डाळ, २00 ग्रॅम उडीद दाळ, १00 ग्रॅम मुगाची डाळ, अर्धी वाटी जिरे, अर्धी वाटी धणे.

प्रकार - ५

साहित्य- ५00 ग्रॅम तांदूळ, १५0 ग्रॅम उडीद डाळ, १५0 ग्रॅम हरभरा डाळ, ५0 ग्रॅम मुगाची डाळ, २00 ग्रॅम ज्वारी, ५0 ग्रॅम जिरे, ५0 ग्रॅम धणे.

कृती- वरील सर्व प्रकारांत डाळी व तांदूळ वेगवेगळे मंद आचेवर भाजून एकत्र करून दळून आणावेत. ज्या प्रकारात ज्वारी आहे- ज्वारीला पाण्याचा हात लावून सडून घ्यावी. नंतर भाजावी. वेगळी भाजून नंतर एकत्र करून दळून आणावे. भाजणी दळून आणल्यावर चकली करतेवेळी-

प्रकार-१ -

भाजणीत तीळ-ओवा-तिखट-मीठ गरम कडकडीत मोहन घालून नीट मिक्स करून गरम पाण्याने पीठ भिजवून अर्धा तास झाकून ठेवावे. पीठ मळून घ्यावे.

प्रकार -२

जाड बुडाच्या पातेल्यात जेवढी भाजणी पीठ घ्यायचे आहे तेवढेच पाणी मोजून घ्यावे व गॅसवर ठेवावे. पाण्यातच तिखट-मीठ, हळद, ओवा-तीळ, मोहन घालावे. पाण्याला उकडी आली की, गॅस बंद करून त्यात पीठ घालावे. नीट ढवळून मिक्स करावे. दोन तास झाकून ठेवावे. पीठ मळून घ्यावे.

पीठ तयार झाल्यावर चकल्या घालण्यासाठी प्लॅस्टिकच्या कागदावर सोर्‍याला चकलीची चकती लावून चकल्या पाडाव्यात. कढईत तेल तापवून मध्यम आचेवर चकल्या तळाव्या. तळून कागदावर पसरावी. गार झाल्यावर डब्यात भरावी.

कणकेच्या चकल्या

साहित्य - २00 ग्रॅम कणीक, हळद, तिखट, मीठ, तीळ, ओवा, हिंग, तळायला तेल.

कृती- पातळ सुती फडक्यात कणकेची सैलसर पुरचुंडी बांधून कुकरमध्ये चाळणीवर ठेवून १५-२0 मिनिटे वाफवून घ्यावी. कुकर गार झाल्यावर पीठ काढून परातीत मोकळं करावं. चाळून घ्यावा. तळायचे तेल सोडून सर्व साहित्य घालून पीठ पाण्याने मळून घ्यावा. मोहन घालू नये. नेहमीप्रमाणे चकल्या कराव्या.

तांदळाच्या पांढर्‍या चकल्या

साहित्य - चार वाट्या तांदळाचे पीठ, एक वाटी उडीद डाळीचे पीठ, एक वाटी पांढरे लोणी, मीठ, एक वाटी ओल्या नारळाचे चव.

कृती- नारळाचे चव मिक्सरमधून थोडे पाणी टाकून बारीक करून घ्यावेत. सर्व साहित्य एकत्र करून कढईत तेल तापवून नेहमीप्रमाणे चकल्या करा.