चीनपुढेही भ्रष्टाचाराचे आव्हान

ऑनलाइन टीम

बीजिंग, दि. ८ - दशकातून एकदा होणार्‍या नेतृत्वबदलासाठी चीनचे सभागृह सज्ज झाले असून, यासाठी आयोजित अधिवेशनाचे उद्घाटन मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांच्या चिंतनपर भाषणाने झाले. कम्युनिस्ट पक्षात भ्रष्टाचार बजबजला असून, सर्व पातळ्यांवर थैमान घालणार्‍या भ्रष्टाचाराचा बीमोड न झाल्यास पक्षाची अधोगती सुरू होईल व कालांतराने पक्ष कोसळेल, असा इशारा जिंताओ यांनी दिला आहे. आपल्या भाषणात जिंताओ यांनी आपल्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत मिळालेल्या यशाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराचा प्रसार व त्याचे धोके यांचा इशारा दिला. भ्रष्टाचाराचा बीमोड व राजकीय एकता हे दोन प्रश्न चीनसमोर आहेत. हे प्रश्न आपल्याला सोडवता न आल्यास पक्षाचा अस्त होण्यास वेळ लागणार नाही, असे जिंताओ यांनी आपल्या ४१ पानी भाषणात सांगितले. अधिवेशनास २२७० निर्वाचित सदस्य उपस्थित होते. पक्षाची शिस्त व राज्याचे कायदे मोडणारांना ते कोणत्याही स्थानावर असतील तरीही त्यांना क्षमा नाही. कोणतीही दयामाया न दाखवता कारवाई केली पाहिजे, असे जिंताओ म्हणाले. आघाडीच्या नेत्यांनी स्वत: शिस्तीचे काटेकोर पालन करावे व घरातल्या मंडळींवर तसेच कर्मचार्‍यांवर काटेकोर लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले. आघाडीच्या नेत्यांनी प्रशासन स्वच्छ व पारदर्शी ठेवावे व प्रत्येक पातळीवरील अधिकार्‍यांनी स्वच्छ अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले. पक्षाच्या संघटनेपेक्षा कोणीही महत्त्वाचे नाही, असे त्यांनी सांगितले. हू जिंताओ यांनी आपल्या भाषणात बो झिलाई या नेत्याचा उल्लेख केला नसला तरीही त्याच्यावरील आरोप व कारवाई याचाच संदर्भ त्यांच्या बोलण्याला होता असे मानले जात आहे. बो झिलाईवर भ्रष्टाचार, लैंगिक अत्याचार असे गुन्हे असून, त्याच्या पत्नीवर खुनाचा आरोप आहे.