जागतिक शेअर बाजार वधारला!

लंडन। दि.७ (वृत्तसंस्था)

बराक ओबामा यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसर्‍यांदा निवड झाल्यानंतर जागतिक शेअर बाजार वधारला, तर अमेरिकी चलन डॉलर घसरले. एकूणच अमेरिकेच्या आर्थिक धोरणात कोणताही नाट्यमय बदल होणार नाही, याचे हे चिन्ह आहे. भारतीय शेअर बाजारातही आज याच कारणामुळे तेजी अवतरली. ओबामा-रोम्नी यांच्यातील तफावत वाढत होती तसतसा सेन्सेक्स उसळताना दिसला.

युरोपातील स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांचा र्मयादित फायदा होण्याची शक्यता आहे. सर्वांचे लक्ष ग्रीसकडे लागले आहे. ग्रीसमधील संसद काटकसरीच्या उपाययोजनांच्या बाजूने मतदान करणार आहे. युरोपीय महासंघ व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून मदत मिळविण्यासाठी काटकसरीच्या उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे. कुठल्याही देशातील बाजारपेठेला राजकीय अस्थिरता आवडत नाही. आता अमेरिकेतील निवडणूक आटोपली आहे. त्यामुळेच बाजारावर सकारात्मक परिणाम झाला, असे मार्क प्रीस्ट (इंडेक्स अँड इक्विटी मेकिंग-इटीएक्स कॅपिटल) यांनी सांगितले.