जात पडताळणी ऑनलाईन

पुणे। दि. २ (प्रतिनिधी)

जात पडताळणी प्रमाणपत्र देताना होणारा विलंब व बनावटगिरी टाळण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हलिडीटी) ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांनी येथे दिली.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुणे शहरात सुरु असलेल्या येरवडा येथील सामाजिक न्याय भवन, मुलांचे वसतीगृह आणि डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच्या बांधकामांची पाहणी करण्यासाठी मोघे सोमवारी पुण्यात आले होते. या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जात पडताळणीसाठी येणारे अर्ज व उपलब्ध कर्मचारी वर्ग पाहता हे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचंड विलंब होतोय. सध्या इंजिनिअरींग व वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी देखील जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यंत संवेदनशील विषय बनला आहे.

मोघे यांनी सोमवारी राज्यातील सर्व १५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्य सचिव यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. जात पडताळणीसाठी अर्ज करताना अर्जदारांकडून सर्व त्रुटीची पुर्तता केली जात नाही, ठराविक व्यक्तींचे प्रमाण पत्र देण्यासाठी समित्यांवर येणारा दबाव, कर्मचा-यांचा अभाव अशा अनेक अडचणी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पासपोर्टच्या धर्तीवर जात पडताळणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहे. यासाठी मानधनावर कर्मचा-यांची भरती करण्यात येणार असून, आवश्यक सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार असल्याचे मोघेंनी सांगितले.

दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, इतर मागासवर्ग व वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ आदी महामंडळामार्फत लाभार्थ्यांना दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येते. यामध्ये होणारी वशीलेबाजी टाळण्यासाठी चालू वर्षापासून कर्ज वाटप लॉटरी पध्दतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मागसवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या ई-स्कॉलरशीपमुळे बोगसगीरी मोठय़ा प्रमाणात कमी झाली असून, गत वर्षी तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांना १६ कोटी रुपयांची स्कॉलरशीप देण्यात आल्याचे मोघे यांनी स्पष्ट केले. बैठकीला समाज कल्याण आयुक्त आर.के.गायकवाड, महासंचालक डी.आर.परिहार, अपंग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव आदी अनेक अधिकारी उपस्थिती होते.