जिल्हा विभाजन पूर्णत्वाकडे!

सुरेश लोखंडे। दि. २९ (ठाणे)

ठाणे जिल्ह्याचे विभाजन प्राधान्याने करण्याच्या दृष्टीने शासनदरबारी युद्धपातळीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत. यास अनुसरून १0 हजार 0७.५0 चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रफळाच्या ठाणे जिल्ह्यातून संभाव्य पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. १५ तालुक्यांपैकी सात तालुक्यांचा ठाणे जिल्हा व आठ तालुक्यांच्या संभाव्य पालघर जिल्ह्याच्या निर्मितीवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे.

या दोन्ही जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र निश्‍चित करणार्‍या नकाशांवर शेवटचा हात फिरविण्याचे काम फक्त शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातून निर्माण होणार्‍या जिल्ह्याचे मुख्यालय जव्हार करण्यासाठी आदिवासी बांधव एकवटला जात आहे. हिवाळी अधिवेशनात जिल्ह्याची घोषणा होणार असल्याचे गृहीत धरून शासनपातळीवर कागदोपत्री तयारीदेखील करण्यात आली होती. पण, ठाणे जिल्हा विभाजनाच्या घोषणेसाठी मुहूर्त मिळालाच नाही. मात्र, ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची कुंडली तयार झालेली आहे.

ठाणे जिल्ह्यातील २४ विधानसभा मतदारसंघांपैकी संभाव्य पालघर जिल्ह्यात

सुमारे ६.५ विधानसभा मतदारसंघ राहणार आहेत. वसई-विरार महापालिकेसह डहाणू, जव्हार, पालघर या तीन नगरपालिका या जिल्ह्यात राहणार आहेत. आठ पंचायत समित्यांसह सुमारे ४६१ ग्रामपंचायतींचा या जिल्ह्यात समावेश केला जात आहे. सात तालुके व चार हजार ६४.३४ चौरस कि.मी. या भौगोलिक क्षेत्रफळाच्या ठाणे जिल्ह्यात मात्र सर्वाधिक सुमारे १७.५ विधानसभा मतदारसंघांचा समावेश राहणार आहे.

ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या सहा महापालिका या संभाव्य ठाणे जिल्ह्यात राहणार आहेत. याप्रमाणेच, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांसह पाच पंचायत समित्या आणि सुमारे ४५३ ग्रामपंचायती या जिल्ह्यात शिल्लक राहणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात १ कोटी १0 लाख ५४ हजार १३१ जणांचे वास्तव्य आहे. पण, विभाजनानंतर या सात तालुक्यांचा ठाणे जिल्हा ८0 लाख ५८ हजार ९३0 लोकसंख्येचा राहणार आहे.

संभाव्य पालघर जिल्ह्याची लोकसंख्या२९ लाख ९५ हजार २0१ राहणार आहे. लोकसंख्या कमी असलेला हा पालघर जिल्हा ५ हजार ९४३.१६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा सर्वात मोठा जिल्हा राहणार आहे.

- ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या सात तालुक्यांचा समावेश राहणार आहे.

- या सात तालुक्यांचा ठाणे जिल्हा सुमारे चार हजार ६४.३४ चौरस किलोमीटरचा राहील.

- संभाव्य पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि वाडा या आठ तालुक्यांचा समावेश असेल.

- क्षेत्रफळ ९४३.१६ चौरस किलोमीटर असेल.