ज्याने दिली चोच, तोच देईल चारा!

विचारार्थ

- संजय पवार

पक्षी विशिष्ट मोसमात थव्यांनी स्थलांतर करतात. त्यांना असलेल्या पंखांच्या अंगभूत सोयीनं ते हजारो, लक्ष मैलाचा प्रवास करून मोसमी स्थलांतर करतात. ज्याने दिली चोच, तोच देईल चारा यावर विश्‍वास ठेवत ‘चार्‍या’ची दिशा पकडत ते स्थलांतर करतात.

पक्ष्यांप्रमाणेच कल्पनेचे म्हणजेच प्रतिभेचे पंख लाभलेले मराठी साहित्यिकही वर्षातले दोन/तीन दिवस स्थलांतर करतात. संमेलन नावाच्या पाणवठय़ासाठी हे स्थानांतर असतं. छोटे गाव ते जिल्हा, शहर, महानगर प्रसंगी परदेश असं हे स्थानांतर असतं. नुकतंच चिपळूण मुक्कामी स्थानांतर करून मंडळी आपापल्या परगण्यात परतली आहेत.

पाणवठा म्हटला की वाद, भांडणं, कुचाळक्या आल्याच! त्यात मराठी साहित्याचा सदाशिवपेठी स्वभाव बघता वाद म्हणजे पर्वणी आणि विद्वत्ता दाखवायची संधी! मराठी साहित्याच्या या सदाशिवपेठी पाणवठय़ावर ‘गंज पेठे’तल्या साहित्य घागरी भरायला विसावं शतक उजाडावं लागलं. उर्वरित गावकरी आणि गावकुसाबाहेरील लोकांना तर संघर्षच करावा लागला. पुढे त्यांनी या सदाशिवपेठी पाणवठय़ाचा नाद सोडला आणि स्वत:च पाण्याचे विद्रोही, समांतर, दलित, आदिवासी, भटके, स्त्रिया, मुस्लीम, ख्रिस्ती असे स्वतंत्र झरे शोधून काढले. या सगळ्यांनी मोरावरच्या सरस्वतीपेक्षा पाटी-पेन्सिल घेऊन जाणारी सावित्रीबाई फुले वंदनीय मानली. हे एवढं सगळं आसपास घडत होतं तरी सदाशिवपेठी साहित्य आणि साहित्यिकांना काल्पनिक सरस्वतीच्या वीणा वादनातच रस राहिला.

शिक्षणाचा हक्क स्वत:कडे राखून ठेवलेल्या, उच्च जातवर्गाची मिरासदारी साहित्य आणि साहित्य संमेलनं यावर राहिली नसती तरच नवल! याच न्यायानं लेखन, वाचन, शिक्षण इथेही हाच वर्ग सातत्यानं किंवा संपूर्णपणे अनभिषिक्त सत्ता गाजवत राहिला. साधा माध्यमिक शिक्षणातला ‘नूमवि पुणे’ पॅटर्न मोडून ‘लातूर पॅटर्न’ यायलाही विसाव्या शतकाची अखेर उजाडली!

अलीकडे संमेलनाच्या पाणवठय़ाला राजाश्रय लागतो! इथेही तीच मानसिकता काम करते. रामदास-शिवाजी, चाणक्य-चंद्रगुप्त राज्याभिषेक आम्ही करणार, बदल्यात त्यांनी रमणे भरवावेत आणि आम्ही पुख्खे झोडणार! एरवी हीच मंडळी राजकारण्यांच्या भ्रष्टाचारावर ‘मै अण्णा हूँ’च्या टोप्या घालून, मेणबत्त्या पेटवत हिंडणार आणि संमेलनात मात्र त्यांच्याच जीवावर चैन करणार! चिपळूणच्या पाणवठय़ावर तर राजाश्रयाची सर्वपक्षीय खैरात झाली! त्या पैशाच्या पावसात सचैल न्हालेल्या साहित्यिकांना त्यांच्या मंडळांना कसलेच भान राहिले नाही आणि ज्यांनी त्यांना ‘बैल’ नी संमेलनांना ‘बैलबाजार’ म्हटले त्या बाळासाहेब ठाकरेंचेच नाव मुख्य व्यासपीठाला देऊन टाकले! अशा साहित्यिकाकडून मग ताठ कणा, एकच बाणा वगैरे अपेक्षा करणं म्हणजे वाळूत मुतणं!

यानंतर महामंडळ, संयोजक, स्वागताध्यक्ष, अध्यक्ष आणि इतर यांनी आणखी काही पराक्रम केले. देशभरात दिल्ली बलात्कार प्रकरणामुळे पुरुषी प्रवृत्तीवर, हिंसेवर मतप्रदर्शन चिंतन होत असताना आईवर संशय घेणार्‍या वडिलांच्या इच्छेनुसार आईचा शिरच्छेद करणार्‍या ‘जातीय’ भूमिकेतून पृथ्वी तीन वेळा नि:क्षत्रिय करणार्‍या पुराणातल्या परशुरामाची, त्याच्या परशुसकट साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका, संमेलन व्यासपीठ इथे सन्मानानं, साभिमानानं मिरवली गेली. त्याला विरोध झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध झाला. पण या विरोधांना न जुमानता आपलं म्हणणं पुढं रेटलं. परशुराम सुरुवातीला बाजूला ठेवला; पण समारोपाआधी तो हट्टानं प्रकटवला; पण या सर्व मंडळींचा हा परशुरामीय निर्धार हमीद दलवाईच्या घरावरून ग्रंथदिंडी काढण्यास विरोध होताच, परशुसह म्यान झाला!

चिपळूण संमेलनातले वाद, त्यावरचे प्रतिवाद वरवर पाहता चहाच्या पेल्यातील भांडणं वाटतील. पण सूक्ष्मपणे पाहिलं तर जातीय/धार्मिक तेढ वाढवणारी अथवा जाती/धर्म संघटन करणारी होती आणि ते जास्त धोकादायक आहे.

या सर्व सापळ्याची सुरुवात अध्यक्षीय निवडीपासून केली गेली. ब्राह्मण्याचा पुरस्कार करणार्‍या मराठेंना ‘वगळून’ कोतापल्लेंना विजयी केलं गेलं. म्हणजे मुखवटा तर चांगला मिळाला! त्यानंतर ‘राष्ट्रवादी’ला हाताशी धरलं गेलं. राष्ट्रवादीची सेना-भाजपाशी ‘आतून दोस्ती’ नवीन नाही आणि राष्ट्रवादी आहे म्हटल्यावर काँग्रेसला उपस्थित राहणं अपरिहार्य ठरलं! राज्यात सेना-भाजपाला सत्तेचं सोपान गाठण्यात कोकण व कोकणी माणसानं भरीव कामगिरी केली. बाळासाहेबांनंतर या व्होटबँकेवर राष्ट्रवादीचा डोळा आहे, त्यामुळे व्यासपीठाला बाळासाहेबांचं नाव देऊन सहानुभूतीचा पहिला गाळा काढण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली! संपूर्ण संमेलनात बाळासाहेबांच्या नावाचं दणक्यात सर्मथन केलं शरद पवारांनी, साहित्यिकांनी नाही!

या अशा नेपथ्यावर परशुरामाला अवतरवण्याचा डाव साधण्यात आला तो ‘कोकणभूमीचा संस्थापक’ म्हणून! वादासाठी मान्य करूया कोकणचं दैवत; पण साहित्याचा काय संबंध त्याचा?

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे याच कोकणभूमीत, चिपळूण जवळील एकाच तालुक्यात तीन भारतरत्न होऊन गेले. महर्षी कर्वे, पां. वा. काणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या तिघांचं विस्मरण होऊन परशुरामाचं नी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण होतं, जाणता राजा शरद पवार त्यांचं हिरिरीनं सर्मथन करतात आणि बैलबाजारात पोळा साजरा होतो! आणि याच भारलेल्या वातावरणात कोतापल्लेंच्या हातात ‘परशु’ देण्याची संघीय खेळी यशस्वी होते. लोकशाहीचा आधार घेत अशी छुपी कारस्थाने करत समाजात पुन्हा जाती/धर्माच्या भिंती ‘साहित्याच्या’ आडून बांधायच्या या वृत्तीचा निषेध करावा तेवढा कमीच.

साहित्य म्हणजे विचार असतो, साहित्य म्हणजे जगणं असतं, साहित्य म्हणजे आत्मसन्मान असतो, साहित्य म्हणजे स्वत:ला प्रकाशमान करत इतरांना प्रकाश दाखवणारं तेज असतं. या आणि अशा संकल्पनांपासून कोसो दूर वीणावादन नी समई प्रज्वलनात रमलेल्या आणि राज्यकर्त्यांकडून पैशांच्या शालीत गुंडाळले गेलेले, काळ्य़ावर पांढरे करणारे चिपळूणच्या पाणवठय़ावर दुसर्‍यांच्या ओंजळीनं पाणी प्याले आणि तीर्थ म्हणून डोळ्यांना, डोक्याला लावून मार्गस्थ झाले.

प्रतिभेचे पंख मिरवणार्‍या या पक्ष्यांनी पोपटासारखी पोपटपंची केली.

आपल्या बाकदार चोची मोकळ्या वातावरणातल्या दगड अथवा भव्य वृक्षाच्या खोडावर न घासता त्या मालकांच्या पायावर घासत, पुन्हा पिंजर्‍यात शिरत ते म्हणाले, ‘तुम्हीच चोच दिलीत, आता तुम्हीच चारा द्या. देत रहा!’