टाळे नसल्याने टपाल गायब..

पाटस। दि. १४ (वार्ताहर)

येथील स्मशानभूमीजवळील ग्रामपंचयातीच्या गाळ्य़ाजवळ लावण्यात आलेल्या टपाल पेटीला कुलूप नसल्यामुळे टपाल चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच, टपाल वेळेत मिळत नसल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली आहे. गावातील टपाल पेट्यांना कुलूप लावण्यात यावे, तसेच गावात अद्ययावत टपाल कार्यालय सुरु करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

स्मशानभूमीच्या गाळ्य़ाजवळील टपाल पेटी मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांना टपाल टाकणे सोयीचे होते. मात्र ज्या- ज्या लोकांनी या पेटीत टपाल

टाकले ते संबंधितांना पोहचलेले नाही. एकंदरीतच या पेटीची

पाहणी केली असता टपाल पेटीला

कुलूपच अस्तिवात नसल्याचे

दिसून आले.

पाटस गाव दौंड तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून

ओळखले जाते. पुणे- सोलापूर महामार्ग, भीमा पाटस कारखाना, तसेच परिसरात असलेल्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमुळे पाटसची लोकसंख्या वाढते आहे. त्या तुलनेत ग्रामस्थांना पोस्टाची सेवा मिळत नाही. रजिस्टर टपाल चार ते पाच दिवसांत मिळते, तर पोस्ट कार्ड दीड ते दोन महिने मिळत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. पाटससारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या गावात मात्र पोस्ट कार्यालय नसल्याची खंत ग्रामस्थांत आहे. ‘भीमा पाटस’वरील पोस्ट कार्यालयांतर्गत पाटस गावात जुन्या ग्रामपंचायतीजवळ छोटेसे सबपोस्ट कार्यालय आहे. गावाची भौगोलिक रचना पाहता गावात अद्ययावत पोस्ट कार्यालय कार्यरत व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.