डम्पिंगअभावी परिस्थिती गंभीर

मधुकर ठाकूर। दि. ७ (उरण)

स्वच्छ उरण, सुंदर उरण ही स्वच्छतेची संकल्पना घेऊन आरोग्याचा सामना करण्यासाठी उरण नगरपरिषदेने अनेक योजना राबवून त्याच्या यशस्वीपणे अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. या संकल्पनेला नागरिकांचाही भरभरून प्रतिसाद मिळू लागल्याने उरण शहर प्लास्टिकमुक्त करण्याची योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. मात्र डम्पिंग ग्राऊंडच्या अपुर्‍या जागेमुळे शहरातून दररोज निघणार्‍या १२ टन ओला सुक्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची उरण नगर परिषदेला कसरत करावी लागते.

दीडशे वर्षांच्या उरण नगरपरिषद शहरात साचणारा कचरा बोरी स्मशानभूमीजवळच्या जागेत टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर २00५ पासून डंपिंग ग्राऊंडचा वापर बंद करण्यात आला. डंपिंग ग्राऊंडसाठी वापरात असलेली जागा सिडकोने न्यायालयाच्या आदेशानंतर भूसंपादनातून वगळली. मात्र उनपच्या नावे ही जागा झाली नाही.

परिणामी उनपला डंपिंग ग्राऊंडच्या जागेला मुकावे लागले. त्यानंतर डंपिंग ग्राऊंडच्या जागेअभावी शहरात साचणारा कचरा नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागला होता. त्यामुळे डंपिंग ग्राऊंडसाठी पाच हेक्टर जागा मिळावी अशी मागणी उनपने सिडको, जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी १२ ऑक्टोबर २00७ साली पाच हेक्टर जागेऐवजी एक हेक्टर जागाच डंपिंग ग्राऊंडसाठी उपलब्ध करून दिली आहे. शासनाने पुनर्वसन केलेल्या हनुमान कोळीवाडा गावाशेजारीच डंपिंग ग्राऊंडसाठी दिलेली जागा पाणथळ आहे. त्या जागेवर भरमसाट खारफुटीची झाडे

आहेत.

ओएनजीसीची गॅसची पाईपलाईनही त्याच जागेतून जात असून सेफ्टी व्हॉल्व सेक्शनही याच जागेत आहे. तसेच डम्पिंग ग्राऊंडला हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचाही कडवा विरोध आहे. या सर्व बाबींमुळे मात्र उनपला या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर शहरातून निघणार्‍या घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करता येत नाही. किंबहुना सॅनिटरी लँडफिल विकसितही करता येत नाही

- झेड. आर. माने, उपवेक्षक तथा आरोग्य अधिकारी, उरण नगर परिषद

नागरिक, व्यापारी यांनी दिलेल्या सहकार्यामुळे उरण शहर प्लास्टिकमुक्त करण्यात उनप यशस्वी ठरली आहे. मात्र तरीही नागरिकांच्या आरोग्यासाठी दररोज साचणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न पूर्णत: निकाली निघाला नाही. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेची समस्या सोडविण्यासाठी शासन, सिडको, जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत डम्पिंग ग्राऊंडसाठी आवश्यक असलेल्या पाच हेक्टर जागेचा प्रश्न निकाली निघेल.

- गणेश शिंदे, नगराध्यक्ष, उरण नगर परिषद