..तर कंत्राटदार काळय़ा यादीत!

- बांगलादेशी कामगार ठेवणो पडणार महागात

डिप्पी वंकानी। दि. १६ (मुंबई)

बांधकाम व्यवसायातील बड्या कंपन्यांच्या ज्या कंत्राटदारांकडे बांगलादेशी कामगार आढळेल अशांना विविध खात्यांनी सरकारी कंत्राटांसाठी ‘काळ्य़ा यादीत’ टाकावे, अशी शिफारस मुंबई पोलिसांची गुप्तवार्ता शाखा करण्याच्या बेतात आहे.

बांधकाम उद्योगात बांगलादेशींना सहज रोजगार मिळून तेथे ते बेमालूमपणे राहू शकतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्यांच्याकडे काम करणार्‍या बांगलादेशींना आम्ही अलीकडेच पकडले अशा कॉन्ट्रॅक्टर व सब कॉन्ट्रॅक्टरविरुद्धही आता आम्ही गुन्हे नोंदवायला सुरुवात केली आहे. हे कंत्राटदार कोणतीही चौकशी न करता कामगारांना कामावर ठेवतात. एवढेच नाही तर कमी मजुरीवरही दिवस-रात्र राबण्यास तयार असल्याने हे कंत्राटदार स्थानिकांपेक्षा बांगलादेशींना कामावर ठेवणे अधिक पसंत करतात, असे

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका अधिकार्‍याने सांगितले. विशेष शाखेने यंदा आतापर्यंत मुंबई शहरातून व काशिमिरा, मीरा रोड, वसई, कामोठे व खारघर यासारख्या उपनगरांत बेकायदा राहणार्‍या १,४४६ बांगलादेशींना अटक केली आहे.

८ नोव्हेंबर रोजी वडाळा टीटी येथे ५0 एकर परिसरातील बांधकामांवर काम करणार्‍या ४८ बांगलादेशींना पकडले गेले. कंत्राटदार वा बांधकाम कंपन्या यांनी घूमजाव करू नये, यासाठी संपूर्ण कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरणही केले आहे. या कारवाईत लार्सन अँण्ड ट्युब्रो कंपनीच्या मोहंमह कशिफ, लल्लन कुमार व धनंजय शंकर, तर जे. कुमार कंपनीच्या देवजीभाई या कंत्राटदारास अटक केली गेली.