‘तिची’ प्रकृती अत्यंत चिंताजनक!

- मेंदूला दुखापत, फुप्फुसात संसर्ग

सिंगापूर। दि. २८ (वृत्तसंस्था)

जीवनासाठी संघर्ष करणार्‍या बलात्कारपीडित युवतीची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

तिच्या मेंदूला मोठी जखम असून, फुफ्फुसांना व पोटात संसर्ग झाला आहे. त्यामुळे तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. प्रकृती सुधारण्यासाठी येथील डॉक्टर अथक प्रयत्न करीत आहेत, असे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केविन लोह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सिंगापूरमधील वेळेनुसार रात्री ९ वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.३0 वाजता) हे निवेदत जारी करण्यात आले. तिला गुरुवारी येथे दाखल केल्यापासून तिची प्रकृती अधिक खालावत आहे, तिचे महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची शक्यता आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.