तू स्वातंत्र्य मिळवलंस.!

अतुल कुलकर्णी।

प्रिय अनामिके, एका वादळासारखी तू काही दिवसांपूर्वी आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात आलीस.. तुझ्या त्या झंझावाती येण्यानं आम्ही आतून-बाहेरून अस्वस्थ झालो होतो.. फक्त बोलून दाखवत नव्हतो एवढंच! तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्याचे पडसाद आमच्याही आयुष्यात उमटले. आजचा दिवस पुन्हा एकदा आम्हाला आंतरबाह्य हलवून गेला.. तुझ्या असाहाय्य, अनंत वेदनांचं वादळ आज शांत झालं.. तू तुझ्यापुरता न्याय करून घेतलास.. तुला स्वातंत्र्य हवं होतं - जगण्याचं, बागडण्याचं, तुला हवं ते करण्याचं.. शेवटी तू ते मिळवलंस.. हिंमत करून, जिद्दीनं, सगळ्यांवर मात करून.. आम्ही मात्र तुझ्या या जीवघेण्या स्वातंत्र्यानं विस्कटून गेलोय... तू गेलीस आणि आमच्याच घरातलं कोणी गेल्याचं दु:ख झालंय.. घसा दाटून येतोय..

तू आमच्या आयुष्यात आलीस आणि आम्ही तुला कोणकोणती नावं दिली.. कोणी दामिनी तर कोणी करिश्मा, तर कोणी अनामिका.. नावं खूप दिली आम्ही, पण आयुष्य नाही देऊ शकलो.! तू जगावीस असंही वाटत होतं आणि तुझ्या तब्येतीच्या बातम्या ऐकून तुला मुक्ती मिळावी असंही.! हे कबूल करतानाही आता मनाला यातना होत आहेत..

तुझ्या जाण्यानं आज मात्र सगळ्यांना प्रचंड असुरक्षित वाटतंय. आजूबाजूला खूप लोक आहेत, तरीही एकटे असल्याची जाणीव.. वेळ आल्यास यातला एखादा तरी आपल्या बाजूनं उभा राहील की नाही याची अनामिक भीती.! आमची बायकापोरं घराबाहेर गेली तर सुरक्षितपणे परत येतील की नाही याची जीवघेणी घालमेल.. कळत नाही कोणत्या शब्दात ही भीती, घालमेल मांडावी.. तुझं आमच्या जीवनात येणं आणि काही क्षणांत असं निघून जाणं यातून आमच्या अस्वस्थतेनं टोक गाठलय.. तू दवाखान्यात तुला हवं ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि आम्ही आतल्या आत होणार्‍या घुसमटीवर मात करण्यासाठी झगडत होतो.. यात विजय मात्र तुझा झाला.!

जेवढे दिवस तुझा लढा चालू होता तेवढे दिवस बाहेर तुझ्या वयाची मुलं-मुली रस्त्यावर उतरली होती, न्याय मागण्यासाठी.! न्याय मिळेल की नाही माहिती नाही.. थोडी वेगळी घटना सांगतो - अमेरिकेत काही गुंडांनी शाळेतल्या लहान मुलांवर गोळ्या झाडल्या. काही निष्पाप मुलं मारली गेली. त्या वेळी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी जे भाषणं केलं, ते त्यांच्या दु:खावर फुंकर घालणारं होतं; आश्‍वासक दिलासा देणारं होतं; त्यात कोणताही सरकारीपणा नव्हता.. त्यांच्यातला बाप आपल्या भावना व्यक्त करीत होता, मात्र त्यामागचा कठोरपणा राष्ट्राध्यक्षांचा होता..

आमच्याकडे असचं काहीसं व्हावं असं वाटत होतं. तुला न्याय मिळावा, म्हणून रस्त्यावर उतरलेल्या मुलांना तसेच आश्‍वासक शब्द ऐकायचे होते. पण त्यांना मिळाली छापील भाषणं.! मलाही तीन मुली आहेत, असं पंतप्रधान वाचून दाखवत होते; राष्ट्रपतीदेखील तेच म्हणाले.. त्यांचा मुलगा वेगळंच काही बोलत होता.! तर गृहमंत्री देखील मलाही तीन मुली आहेत, असं सांगत होते. तरीही अशा घटना का घडतात, याचं मात्र उत्तर कोठेच मिळत नव्हतं. दिल्ली पोलिसांनी तुझ्या स्टेटमेंटमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केल्याचा लेखी आरोप मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीच केला.! तर काही राजकारणी या सगळ्या वादावादीत आपली पोळी भाजून घेताना दिसत होते.. सगळ्यांच्या संवेदना हळव्या अन् होत्या छापील होत्या. हे सगळं चालू असताना दिल्लीतच आणखी एका ४0 वर्षीय महिलेला तुझ्यासारख्याच भयंकर अनुभवाला सामोरे जावे लागले. घटना थांबतच नाहीत.! या देशात कोणत्या ना कोणत्या कोपर्‍यात या अशा वेदनांना सामोरे जाणार्‍या हजारो, लाखो अनामिका मूकपणे सगळं सहन करीत आहेत..

तू मात्र या निघून गेलीस शांतपणे.. तुझ्या जाण्याने गळा घोटला जात असलेल्या व्यवस्थेत पुन्हा एकदा प्राण फुंकण्याचा प्रयत्न तू केलास.. ‘स्व’च्या पलीकडे विचारच हरवलेल्यांना विचार करण्याची मानसिकता दिलीस.. वर्षानुवर्षे अन्याय सहन करणार्‍या मुलींना, महिलांना संरक्षण देण्यासाठी, व्यवस्थेत बदल करण्यासाठी विवश केलंस.. जाता जाता तू हे काळंकुट्ट वर्षही सोबत नेलसं.! चांगलं, आशादायी वर्ष लवकरच येईल या अपेक्षेनं.. तुझ्या या हिमतीला, धाडसाला आणि जगण्यासाठीच्या चिवट झुंजीला शतश: नमन..