दिवाळीभेट!

मुंबई। दि. ७ (विशेष प्रतिनिधी)

राज्य सरकारने आज राज्य सरकारी कर्मचार्‍यांना ७ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यासह गरिबांना ९ सिंलिंडर स्वस्तात देण्याचा निर्णय जाहीर करून दिवाळीभेट दिली. तसेच वीज कर्मचार्‍यांनाही ८ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा आज ऊर्जामंत्र्यांनी केली आहे.

वाढीव महागाई भत्त्याचा फायदा १७ लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि वित्त मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले, ही वाढ १ नोव्हेंबर २0१२ पासून लागू करण्यात येणार आहे. राज्य शासनाने १ जुलैऐवजी १ नोव्हेंबरपासून महागाई भत्त्यातील वाढ लागू केली आहे.

सबसिडीवरील तीन अतिरिक्त गॅस सिलिंडर पिवळे रेशनकार्डधारक (बीपीएल) व केशरी रेशनकार्डधारक (एपीएल) कुटुंबांना देण्यात येतील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. याचा फायदा दारिद्य रेषेखालील कुटुंबे आणि एक लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना होईल.