दिवाळी पहाटमध्ये हरवले अंधेरीकर

मनोहर कुंभेजकर। दि. १३ (अंधेरी)

दररोज सकाळी पहाटे उठून कामावर जाणारे अंधेरीकर आज नेहमीपेक्षा पहाटे लवकर उठले. यासाठी निमित्त होते ते दिवाळी पहाटचे.

चार बंगला येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या पटांगणावर पालिका सभागृह नेते यशोधर (शैलेष) फणसे यांनी शिवसेना शाखा क्रमांक ५५ व ५६ च्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन केले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास सुमारे एक हजारहून अधिक अंधेरीकरांनी या ठिकाणी हजेरी लावून सांगीतिक मेजवानीचा सुमारे साडेतीन तास मनमुराद आनंद लुटला. सोबत गरम गरम आल्याचा चहा व घरी परतताना महिला बचत गटाने केलेला फराळ, सुगंधी उटणे व कॅलेंडर खास तयार केलेल्या कापडी पिशवीत घेऊन अंधेरीकर आपापल्या घरी परतले.

प्रसिद्ध गायक अमर मोहिले यांनी दिवाळी पहाटेच संगीत संयोजन केले होते. गेली नऊ वर्षे या दिवाळी पहाटमध्ये संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार कै. अनिल मोहिले करीत होते. अंधेरीकर असलेले अनिल मोहिले यांचे तसेच प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांचे गेल्यावर्षी दुर्दैवी निधन झाले. या संगीतकारांची आठवण या गायकांनी काढताच उपस्थितांचे मन हेलावूनच गेले.

प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, मंदार आपटे, अमृता नातू, जयदीप भरखडकर, कविता निकम यांच्या लावण्या, प्रेमगीत व अनेक प्रसिद्ध गाण्यांनी अंधेरीकरांना जणू मंत्रमुग्ध केले. विनोदाचा बादशाह जॉनी रावत यांनी आपल्या विनोदी शैलीत अंधेरीकरांना हस्याचे फवारे उडवायला भाग पाडले. कार्यक्रमाचे खुसखुशीत निवेदन प्रसिद्ध निवेदक हेमंत बर्वे यांनी केले.

वर्सोवा लोखंडवालासारख्या हिंदी भाषिक वातावरणात फणसे यांनी मराठीपण टिकवून ठेवले आहे. भल्या सकाळीच या ठिकाणी संगीत रसिक अंधेरीकरांची गर्दी याची साक्ष देते, अशा शब्दांत वैशाली सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी कालच डॉक्टरेट मिळविणारे आमदार, विभागप्रमुख अँड. अनिल परब यांचा तसेच अंधेरी २00१ साली सर्वप्रथम दिवाळी पहाटची संकल्पना राबविणारे ‘आम्ही अंधेरीकर’ या संस्थेचे संस्थापक अजित दिघे यांचाही फणसे यांनी जाहीर सत्कार केला. २00१ व २00२ साली दिघे, माजी उपमहापौर अरुण देव व प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडीलकर यांनी या ठिकाणी दिवाळी पहाटचे आयोजन केले होते. त्यानंतर मात्र २00३ पासून फणसे या ठिकाणी दिवाळी आयोजन करीत आले आहेत.

या प्रसंगी महिला विभागप्रमुख राजूल पटेल, उपविभाग प्रमुख राजेश शेट्ये व सुनील दळवी, महिला उपविभाग संघटक मनीषा मोरे, माजी नगरसेवक विष्णू कोरगावकर, शाखाप्रमुख सूर्यकांत खवळे सुनील बोले, महिला शाखा संघटक शीतल सावंत व जागृती भानजी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.