दुखापतीमुळे आगरकरची माघार

मुंबई। दि. ७ (क्रीडा प्रतिनिधी)

रणजी करंडक स्पध्रेच्या पहिल्या सामन्यानंतरच दुखापतीमुळे माघार घेणार्‍या बरोडाच्या इरफान पठाणच्या पंगतीत मुंबईचा कर्णधार अजित आगरकरही जाऊन बसला आहे. पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे आगरकरने पुढील सामन्यांतून माघार घेतली असून, त्याऐवजी मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबईचा पुढील मुकाबला गतविजेत्या राजस्थान संघाशी आहे.

सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि अजिंक्ये रहाणे यांच्या पुढील सामन्यातील अनुपस्थितीमुळे आधीच कमकुवत झालेल्या मुंबईला हा एक जबर धक्का आहे. मोठय़ा खेळाडूंच्या अनुपस्थितीत उतरणार्‍या मुंबईचा पुढील मुकाबला गतविजेत्यांशी असल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे. हा सामना ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जयपूरमध्ये खेळविण्यात येणार आहे.

या मोठय़ा खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबई संघात सूर्यकुमार यादव, क्षेमल वैंगणकर, हिकेन शाह आणि शोएब शेख यांना संधी देण्यात आली आहे.