‘दूध बंद’चा परिणाम पुण्यात नाही

पुणे। दि. १३ (प्रतिनिधी)

शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे ‘दूध बंद’ झाले तरी पुण्यावर परिणाम होणार नाही. पुण्यातील दुधाची गरज स्थानिक स्तरावरच भागविली जाते. मात्र, राज्यात ४ ते ५ लाख लिटरचा तुटवडा निर्माण होणार असल्याने मुंबईला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जेथे दूध रस्त्यावर ओतून देत असतील, तेथे सहकारी दूध संस्था उद्यापासून संकलन करणार नाहीत. यामुळे चार ते पाच लाख लिटर दूध पश्‍चिम महाराष्ट्रात कमी संकलन होईल, अशी माहिती अखिल भारतीय दूध उत्पादक महासंघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पश्‍चिम महाराष्ट्रातून दररोज १ कोटी २५ लाख लिटर दूध संकलित होते. सहकारी दूध संस्था काही भागांमध्ये संकलन बंद करणार आहेत. त्यामुळे ४ ते ५ लाख लिटर दूध नेहमीपेक्षा कमी संकलित होईल. मात्र, दुधाच्या दरवाढीवर त्याचा परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सांगलीतील आंदोलनाचा पुण्यात येणार्‍या दुधावर काही परिणाम होईल असे वाटत नाही, असे चितळे डेअरीचे संचालक श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले.