दोन हजार द्या अन् फरार राहा!

राजेश निस्ताने। दि. २२ (यवतमाळ)

महिन्याकाठी दोन हजार रुपये द्या आणि संचित रजेवरून पाहिजे तेवढे दिवस फरार रहा, हा नवा फंडा आहे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एका जेलरचा. संचित रजेवर सुमारे वर्षभर फरार राहून अलीकडेच पोलिसांच्या हाती लागलेल्या जन्मठेपेच्या दोन कैद्यांनीच कारागृहातील या भ्रष्ट कारभाराचे बिंग फोडले आहे.

शंकर लांडगे आणि देवानंद महाकाळकर अशी या कैद्यांची नावे आहेत. शंकरला १0 जानेवारी रोजी तर देवानंदला १४ जानेवारी रोजी सेवाग्राम पोलिसांनी अटक केली. एप्रिल २0१२पासून संचित रजेवरून हे फरार होते. शंकर व देवानंद यांनी ‘आपण एवढे महिने फरारीत असे काढले’ याचे रहस्योद्घाटन करताच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.