धरणे आंदोलन अखेर थांबविले

लासुर्णे। दि. १९ (वार्ताहर)

लासुर्णे (ता. इंदापूर) येथे सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवकांवर विकास कामामध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी तीन दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलन चौकशी समिती नेमण्याच्या आश्‍वासनानंतर शुक्रवारी (दि. १८) मागे घेण्यात आले. सोमवारी (दि. २१) आंदोलनकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमवेत चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे.

लासुर्णे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि तत्कालिन ग्रामसेवक यांनी विकास कामात केलेल्या कथीत गैरव्यवहाराची चौकशी करणे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. आज तिसर्‍या दिवशी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता (दक्षिण) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिनिधी जे. आर. विभुते आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी के. सी. जाधव यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी विभुते यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना २१ जानेवारी सोमवारी स. ११ वाजता जिल्हा परिषद पुणे येथे चर्चेसाठी वेळ देण्यात येईल. त्यानंतर समिती निश्‍चित करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. तसेच, चौकशी होईपर्यंत ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारे काम करू नये, असे गटविकास अधिकारी यांच्या आदेशान्वये कळविण्यात येईल, असे सांगितले. यावेळी आनंद लोंढे, विजय निंबाळकर, श्रीकांत खरात, विशाल जाधव, डॉ. मोहिते, दिलीप निंबाळकर, नेताजी लोंढे, अरुण कदम, बापूराव खरजूल, रमेश नरुटे, पांडुरंग रुपनवर, विजय निंबाळकर आदी उपस्थित होते.

पाठिंबा नव्हता : पाटील

छत्रपती कारखान्याचे संचालक वैजनाथ पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी केवळ चर्चेसाठी भेट दिल्याचा दावा केला आहे. गावात एकोपा राहावा, सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आंदोलनामुळे वाद वाढू नयेत, अशी आपली भूमिका आहे. ही भूमिका मांडण्यासाठीच आंदोलनाच्या ठिकाणी आपण गेलो होतो. त्यांना पाठिंबा व्यक्त करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे पाटील यांनी सांगितले.