धोनीला ‘वॉल’चा सपोर्ट

नवी दिल्ली। दि. १२ (वृत्तसंस्था)

सलग सात कसोटी पराभवानंतरही भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी महेंद्रसिंह धोनीलाच पसंती माजी कसोटीपटू राहुल द्रविड याने दिली आहे. परंतु, भविष्यात माहीतील यष्टिरक्षक आणि फलंदाज चांगली कामगिरी करावा याकरिता त्याच्यावरील क्रिकेटच्या एका फॉरमॅटवरील जबाबदारी हटवण्याचा विचार निवड समितीने करावा, असा सल्लाही द्रविडने सुचवला आहे. या मतामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात व्हाइटवॉश पत्करल्यानंतर टीकेचे लक्ष्य बनलेल्या माहीला ‘वॉल’चा सपोर्ट मिळाला आहे.

तो म्हणाला, ‘‘धोनीच्याच दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास, एखाद्या खेळाडूची सर्वo्रेष्ठ कामगिरी पाहणे सर्वांना आवडेल. धोनीने यष्टिरक्षक आणि फलंदाजीतून योगदान देऊ शकतो आणि आपण त्याचे सर्वोकृष्ट प्रदर्शन पाहण्यास उत्सुक आहोत. मला वाटत नाही धोनीचा हा ब्लास आपण कुणी मिस करू इच्छितो. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या परदेशातील मालिकांचा अभ्यास करावा. तसेच निवड समितीनेही धोनीला खेळाडू निवडण्याची पुरेशी मुभा द्यावी आणि मत मांडू द्यावे.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘एक खेळाडू म्हणून धोनीला चांगली कामगिरी करता यावी यासाठी एका फॉरमॅटमधून त्याच्यावरील जबाबदारी कुण्या दुसर्‍याला सोपवावी. जेणेकरून धोनीतील फलंदाज आणि यष्टिरक्षक मनमोकळेपणाने खेळ करेल. धोनीला संधी देणे गरजेचे आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आपण कसोटीत सलग सात पराभव पत्करले असले तरी याच धोनीने आपल्याला वर्ल्डकप जिंकवून दिला आणि कसोटीत नंबर वन स्थानही मिळवून दिले आहे.’’

वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, दुखापती आणि खराब फॉर्माशी सध्या हे दोघेही झगडत आहेत. विराट कोहली याच्यावर कर्णधारपदाची मदार सोपविण्यास काहीच हरकत नाही. परंतु, पुढील १२ महिन्यांत त्याची कामगिरी कशी होते, यावर सर्व अवलंबून असल्याचे मतही द्रविडने या वेळी व्यक्त केले.