निषेधाची धग कायम!

- ‘निर्भया’ची झुंज अन् स्वप्ने एकत्रच विसावली..

नवी दिल्ली । दि.३0 (लोकमत न्यूज नेटवर्क)

डॉक्टर बनण्याचे ध्येय बाळगणारी ‘ती’ म्हणजे ‘निर्भया’ येत्या फेब्रुवारीत विवाहबद्ध होणार होती. पण १६ डिसेंबरला सहा नराधमांनी तिचे हे स्वप्न बेचिराख केले. रविवारी उगवत्या सूर्याच्या साक्षीने तिच्यावर झालेल्या अंत्यसंस्कारांनंतर तिची झुंज आणि स्वप्ने इतिहास रचून कायमची विसावली. मात्र या अत्याचाराविरोधातील निषेधाची धग अजूनही देशभरात कायम आहे. जवळपास सर्वच महानगरांमध्ये निषेधार्थ निदर्शने झाली.

२३ वर्षीय ‘निर्भया’चे पार्थिव आज पहाटे ३.३0 वाजता एअर इंडियाच्या विशेष विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी विमानतळावर हजर होते.

मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी ‘निर्भया’चे आई-वडील व भावांना भेटून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर एका खासगी अँम्बुलन्सने तिचे पार्थिव दक्षिण-पश्‍चिम दिल्लीतील तिच्या निवासस्थानी नेण्यात आले. याठिकाणी काही धार्मिक विधी केल्यानंतर जवळच्याच द्वारका स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाडकी लेक अन् ..

‘दामिनी’ तिच्या आई- वडिलांची लाडकी लेक. तिला दोन लहान भाऊ आहेत. ती आपल्या भावांची घरीच शिकवणी घ्यायची. आता त्या भावांना शिकवणारी बहिण कधीच दिसणार नाही, असे आर्त स्वरात तिचे काका सांगत होते. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. तिने मेडिकलला प्रवेश मिळवला. तिची फक्त इंटर्नशिप बाकी होती. आई-वडिलांचे स्वप्न तिला पूर्ण करायचे होते, असे पाणावलेल्या डोळ्य़ांनी तिचे काका सांगत होते.

कडेकोट बंदोबस्त

विमानतळावर सुमारे दोन हजार पोलीस तैनात होते. ‘दामिनी’च्या निवासस्थानापासून स्मशानभूमीपर्यंत शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांना पोलीस सुरक्षेत बसमध्ये स्मशानभूमीवर आणण्यात आले. तेथे माध्यमांना प्रवेश देण्यात आला नाही.

जंतर-मंतरवर निदर्शने

सामूहिक बलात्कारातील दोषी नराधमांना तत्काळ शिक्षा देण्याच्या मागणीवरून रविवारी पुन्हा तरुणाई रस्त्यावर उतरली. जंतर-मंतरवर शांततेत निदर्शने करीत होते. मात्र अभाविपचे कथित कार्यकर्ते व पोलिसांमध्ये संघर्ष उडाल्याने शांततापूर्ण आंदोलनाला हिंसेचे गालबोट लागले.