पिंगळा

अरण्यात.

- बैजू पाटील

पक्षीसृष्टीतील छोट्या-मोठय़ा असंख्य पक्ष्यांपैकी सर्वाधिक समज, असमज आणि दंतकथा संबंधित आहेत त्या ‘पिंगळा’ या पक्ष्याविषयी. साधारणपणे ज्या जिवाशी आपला फारसा संबंध येत नाही किंवा जे जीव आपल्या फारशा परिचयाचे नसतात, अशा जीवजंतूंबाबतच समज-गैरसमज अधिक असतात. त्याबद्दलचे किस्से-कहाण्या आणि दंतकथाही अधिक असतात. पिंगळा हा एक निशाचर पक्षी आहे. म्हणजे त्याचा वावर, हालचाली चालू असतात त्या रात्रीच्या वेळी. भर वस्ती, गर्दीगोंगाटात त्याला राहायला आवडत नाही. त्याचा आवाज भेसूर असतो. त्याचे दिसणेही प्रसन्न वा मोहक नाही. वटारलेले दोन मोठे डोळे, मध्यभागी अणकुचीदार चोच, गुबगुबीत वाटोळा चेहरा आणि गरगरा फिरू शकणारी गर्दन, छोट्या आकाराचे ताठ कान अशा त्याच्या दृश्यरूपामुळे पिंगळा पाहिल्यावर भीती, दहशत आणि तणावाचीच माणसाला अनुभूती होते. पडके वाडे, जुने वठलेले वृक्ष, स्मशान, खंडर आणि मानवी वावर नसणारी निर्जन ठिकाणे ही त्याची आवडती स्थळे. यामुळे पिंगळ्य़ाबाबत अनेक चित्रविचित्र समजुती जगाच्या पाठीवरील सर्वच समाजातून आढळून येतात.

पिंगळ्य़ाचे दर्शन ‘अशुभ’ मानले जाते. पिंगळा दिसणे हा मृत्यूचा वा एखाद्या वाईट घटनेचा संकेत आहे, असे मानले जाते. पिंगळा म्हणजे मृत्यूदेवतेचे प्रतीक मानले जाते. भुतेखेते, चेटकिणी, काला जादू, चेटूक, ‘टुव्हिलस्पिरिट’चे पिंगळा हे प्रतीक मानले जाते. जगात सर्वत्रच अशा समजुती आहेत. पिंगळ्याची ही माणसाला बसलेली दहशत इतकी मोठी आहे की, प्रत्यक्ष पिंगळा न दिसता ते स्वप्नात जरी दिसले तरी ते अत्यंत अशुभ मानले जाते. ज्याला स्वप्नात पिंगळा दिसले, त्याचा मृत्यू जवळ आलाय असे मानतात. तर ग्रीक पुराणात पिंगळा हे बुद्धिदेवतेचे वाहन मानलेले आहे. युद्धमोहिमेवर निघालेले ग्रीक सैनिक पिंगळाचे दर्शन झाले तर आपला विजय सुनिश्‍चित आहे, असे मानत. अथेन्स शहरात प्राचीन काळी वापरल्या जाणार्‍या चलनी नाण्यांवर पिंगळ्याचे चित्र अंकित केलेले असे. चीनमध्ये पिंगळ्याचा बळी देऊन भुतेखेते काढता येतात, उतरवता येतात असा समज आढळतो. परिणामी, त्या देशात बळी देण्यासाठी पिंगळ्यांना मागणी असते. चढय़ा किमतीत हा पक्षी विकला जातो. थोडक्यात, पिंगळ्याबाबतचे अशा समज- अपसमजाबद्दल पुष्कळ काही सांगता येईल.

एक वन्यजीव छायाचित्रकार या नात्यानं पिंगळा हा एक खूप फोटोजेनिक पक्षी आहे, असे मला वाटते. जेमतेम पाच इंच आकाराच्या पिंगळ्य़ापासून दीड-दोन फूट आकाराचा धिप्पाड पिंगळा मी पाहिलेला आहे. तांबड्या, करड्या, हिरवट काळपट , पट्टेरी, ठिपकेवाली, ताठ कानांची अशा विविध रंगरूपाची पिंगळे मी पाहिलेली आहेत. पिंगळ्य़ांचे दृश्यरूप अनेकांना भीतिदायक वाटते ते प्रामुख्याने त्याच्या वाटोळ्या तोंडावरच्या दोन बटबटीत वटारलेल्या डोळ्यांमुळे. हे डोळे हेच पिंगळ्य़ाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्याचे शक्तिस्थान आहे. मोठय़ा आकाराच्या डोळ्यांमुळे पिंगळ्याचा ‘रेटिना’ म्हणजे ज्या पटलावर वस्तूचे प्रतिबिंब उमटते आणि त्या जिवाला दिसते ते पटलही अन्य पक्ष्यांपेक्षा अधिक मोठे असते. त्यामुळेच एखाद्या दुर्बिणीसारखी दृष्टी पिंगळ्याला लाभलेली असते. खूप लांबचेही तो नीट पाहू शकतो. पिंगळा आपली गर्दन गोल फिरवू शकतो म्हणजे ३६0 अंशात फिरवू शकतो, असे आपण मानतो, ते ढोबळमानाने खरे आहे; परंतु गणितीपद्धतीने पाहिले तर पिंगळा ३६0 अंशात आपली गर्दन फिरवू शकत नाही. तो फक्त २७0 अंशातच त्याची गर्दन फिरवू शकतो. उंदीर, चिचुंद्री, पाली, सरडे, घूस, सरपटणारे अन्य जीव तो खातो. हे सगळे जीव पिकांचे नुकसान करणारे असतात. ते पिंगळा खातो त्यामुळे तो एकाअर्थी शेतकर्‍यांचा मित्रच असतो. इंडोनेशियात तर पामतेलासाठी ‘पाम’ अर्थात ताडसदृश वृक्षाची मोठी लागवड असते. पामच्या शेतीला उंदरांचा मोठा उपद्रव असतो. त्यावर उपाय म्हणून तिकडे शेतात पिंगळे पाळलेली असतात. ती शेतातले उंदीर बरोबर पकडतात आणि अगोदर त्याचे डोके ठेचतात आणि मग खाऊन टाकतात. पिंगळ्याच्या विष्ठेत फॉस्फरस, गंधक, कॅल्शियम असे शेतीस उपयुक्त घटक असतात.

हा फोटो मी भरतपूर पक्षीअभयारण्यात काढलेला आहे. थंडीच्या मोसमात एकमेकांना बिलगून ही तीन पिंगळे कोवळे ऊन खात बसलेली आहेत. ती ‘स्पॉटेड आउटलेट’ म्हणून ओळखली जातात. त्यांना अ३ँील्ली ु१ें असे नाव आहे. वाळलेल्या एका झाडाच्या ढोलीत त्यांचे निवासस्थान आहे. पिंगळ्यांच्या जगभरात मिळून दोनशेपेक्षा जास्ती प्रजाती आहेत. चित्रातील पिंगळ्यांची किंकाळीचा सुरुवातीचा आवाज चिर्र.. चिर्र.. असा असतो आणि त्याचा शेवट चिवक-चिवक-चिवक असा काहीसा होतो. पिंगळ्यांना आपण घाबरायचे खरे तर काहीही संयुक्तिक कारण नाही. उलट पिंगळ्य़ांची संख्या अनेक कारणांमुळे, मानवी हस्तक्षेपामुळे, शिकारीमुळे कमी कमी होत चालली आहे. त्यामुळेच पिंगळ्यांना इंडियन वाईल्डलाइफ प्रोटेक्शन कायद्याच्या पहिल्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेले आहे. बहुतेक प्रजातीची पिंगळे दिवसा डोळे मिटून झोपा घेतात आणि रात्री उंदीर मारून माणसाला मदतच करतात. तेव्हा पिंगळ्य़ाविषयी आकस वा गैरसमज नको!

शब्दांकन : सुधीर सेवेकर