पिशवीत आढळला मृतदेह

मुंबई। दि. २२ (प्रतिनिधी)

घाटकोपरच्या भट वाडीतून बेपत्ता झालेल्या ३२ वर्षीय विधवेचा मृतदेह मुलुंडच्या एनएस रोडवरील फुटपाथवर प्लास्टिक पिशवीत आढळला. पोलिसांच्या पाहणीत प्रतीक्षाच्या शरीरावर धारदार शस्त्राचे तब्बल १२ ते १५ वार आढळले.

दोन वर्षांपूर्वी प्रतीक्षा यांचे पती प्रकाश यांचे निधन झाले होते. त्यानंतर घरकाम करून त्या तीन मुलांचे पालनपोषण करीत होत्या. काल रात्री त्या घरी न परतल्याने त्यांच्या भावाने रात्रभर वाट पाहून सकाळी घाटकोपर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदवली.

दुसरीकडे सकाळी आठच्या सुमारास कचरावेचक महिलेने एनएस रोडवरील आरती स्नॅक्स कॉर्नर दुकानासमोर पडलेली शुभ्र रंगाची प्लास्टिकची पिशवी कुतुहलाने उघडून पाहिली. आत डोकावताच या महिलेला घाम फुटला. आत महिलेचा रक्ताळलेला मृतदेह होता. तिने अन्य पादचार्‍यांच्या मदतीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात धाडला. मृतेहाच्या पाहणीतून प्रतीक्षा यांची हत्या काल रात्री झाली असावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रतीक्षाच्या मृतदेहावरील सोन्याचे दागिने शाबूत होते. त्यामुळे ही हत्या लूटमारीच्या उद्देशाने झालेली नसल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाल्याचा दावा मुलुंड पोलीस करतात. ही हत्या कौटुंबिक कलह, खासगी आयुष्यात निर्माण झालेले वाद यातून झाली का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.