प्लेसमेंटची दिवाळी

पराग पोतदार। दि. १३ (पुणे)

पुण्यातील ऑटो व अन्य उत्पादन क्षेत्राशी संबंधित कोअर कंपन्यांचे ‘प्लेसमेंट’चे प्रमाण स्थिर असून त्यांनी नव्या ‘टॅलेंट’ला लाखोंची पॅकेजही देऊ केलेली आहेत. त्यामुळे त्यात संधी मिळालेल्या तरुणांची ‘दिवाळी’ साजरी होणार आहे. दुसर्‍या बाजूला मात्र जागतिक मंदीच्या लाटेतून आयटी क्षेत्र अद्याप सावरलेले नसल्याने प्लेसमेंटबाबत या कंपन्यांनी आखडता हात घेतला आहे.

पुणे शहरात सुरू झालेल्या प्लेसमेंटची एकूण वाटचाल पाहता, आत्तापर्यंत कोअर कंपन्यांकडेच अधिक कल असल्याचे दिसून येते. विशेषत: पुणे परिसरात विकसित होत असलेल्या ऑटो हबमधील मोठय़ा जागतिक कंपन्यांकडून हुशार तरुणांना मागणी आहे. टाटा मोटर्स, जनरल मोटर्स, फियाट अशा कंपन्यांकडून मागणी वाढलेली आहे.

कोअर कंपन्यांमध्ये चांगली पॅकेज मिळत नाहीत, हा समज आता खोटा ठरलेला असून नुकत्याच झालेल्या प्लेसमेंटमध्ये काही विद्यार्थ्यांना वार्षिक ८ ते १0 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळाली आहेत. सर्वसाधारणपणे २ ते ५ लाख रुपयांची पॅकेज विद्यार्थ्यांना मिळत आहेत. जपानी कंपन्यांकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात आहे. टाटा स्टील, टाटा मोटर्स या कंपन्याही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पुढाकार घेत आहेत.

जागतिक दर्जाच्या अनेक आयटी व इतर कंपन्या मात्र ‘वेट अँड

वॉच’ भूमिकेत आहेत. जॉन डिअरसारखी मोठी कंपनी यंदा अजूनही प्लेसमेंटच्या मैदानात उतरलेली नाही. हीच बाब इटन व कमिन्ससारख्या कंपन्यांबाबत दिसून येत आहे. यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत आयटी कंपन्यांचे प्रमाण कमी झाले आहे, तर कोअर कंपन्यांवर मात्र मंदीचा परिणाम झाला नसल्याने त्यांचे प्रमाण आहे तितकेच राहिलेले आहे.