फटाक्यांपासून चिमण्यांना वाचवा!

मुंबई। दि. १३ (प्रतिनिधी)

दिवाळीत खरेदी, फराळ आणि फटाक्यांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. मात्र फटाक्यांच्या आवाजांनी ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.

आवाजाचे फटाक्यांऐवजी प्रकाश पसरवणार्‍या फटाक्यांचा वापर करण्याचे आवाहन पक्षीप्रेमी संस्था करत आहेत. दिवाळीच्या महिनाभर आधीपासूनच आवाजाचे फटाके लावल्यामुळे बरेच पशुपक्षी जखमी होतात. त्यामुळे इमारतीभोवती उभारण्यात आलेल्या भिंतीमधील, बिळांमध्ये फटाके लावल्यामुळे लपलेले उंदीर, घुस आणि सापासारखे प्राणी जखमी होतात. आकाशात सोडण्यात येणारी रॉकेट वृक्षांवरील घरट्यांवर आदळल्याने अनेकदा पक्षी व त्यांची पिल्ले जखमी होतात, अशा गंभीर परिस्थितीत फटाक्यामुळे झालेले वायू प्रदूषणही पक्ष्यांच्या जीवावर बेतते. फटाक्यांच्या ध्वनी प्रदुषणामुळे पशु-पक्ष्यांनाही कर्णबधिर होण्याचा धोका संभवतो. मुक्या पशूपक्ष्यांना वाचवण्यासाठी दिवाळी हा सण फक्त कंदील लावून, गोडधोड खाऊन आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेऊन साजरा करावा. त्याचप्रमाणे दिवाळी दरम्यान आवाजांच्या फटाक्यांपेक्षा रंगीबेरंगी फुटणारे, न आवाज करणारे फटाके वाजवण्याचे आवाहन स्पॅरोज शेल्टर

संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे.