बंदी यादीत एकही ‘भगवी’ संघटना नाही!

नवी दिल्ली। दि. २२ (लोकमत न्यूज नेटवर्क)

देशात अलीकडेच झालेल्या काही अतिरेकी कारवायांबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा तसेच हिंदू वा भगव्या संघटनांवर ठपका ठेवला असला तरी त्यांच्याच गृह मंत्रालयाने तयार केलेल्या ३५ अतिरेकी संघटनांच्या यादीत अशा प्रकारची एकही संघटना नाही, हे विशेष!

बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्यान्वये बंदी घातलेल्या ३५ संघटनांची यादी गृह मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. त्यात १३ इस्लामी, ४ शीख अतिरेकी संघटना, ३ माओवाद्यांशी संबंधित तर ईशान्येकडील १0 संघटनांचा समावेश आहे. यात काही फुटीर गटदेखील आहेत. पण, भाजपा किंवा संघाशी निगडित असलेल्या ‘भगव्या’ वा हिंदू अतिरेकी संघटनेचा त्यात समावेश नाही.

तामिळनाडू लिबरेशन आर्मी, तमिळ नॅशनल रिट्रिव्हल ट्रूप्स आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम यांचा मात्र या यादीत समावेश आहे.