‘बंदे मे था दम’

अंबर विनोद हडप लिखित ‘बंदे मे था दम’ हे व्यावसायिक नाटक एकांकिकेवर बेतलेले असून विजू माने प्रॉडक्शन आणि अमृता प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ते व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे. नाटककार विनोद हडप यांचे अंबर हे चिरंजीव असून त्यांचा वारसा ते चालवीत आहेत. यापूर्वी अंबर हडप यांनी एकांकिका, दूरदर्शन मालिका, चित्रपट कथा आदींचे संवाद लिहिले असून व्यावसायिक रंगभूमीवर आलेले पहिलेच नाटक आहे.

‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातील ‘बंदे मे था दम’ या गीताच्या चरणाचा नाटकाच्या शीर्षकासाठी उपयोग करण्यात आला आहे, त्यात नाटकाच्या विषयाचे सूचन होते. त्याप्रमाणे नाटकात ते घडतेच. शिवाय त्यात आजच्या वर्तमानास संयुक्तिक आणि त्याचबरोबर खर्‍या इतिहासाविषयी, त्याच्या विपर्यासाविषयी, राजकीय विपर्यासाविषयी, अप्पलपोटेपणाविषयी, जाऊ देत या सामान्य माणसाच्या निष्क्रियतेविषयी अशा अनेक गोष्टींविषयीची त्यात दखल घेण्यात आली आहे. जे मांडायचे आहे त्याबद्दल नाटककार गंभीर आहे. त्यातील छोटीछोटी विधाने विचार करायला लावतात.

स्वातंत्र्यलढय़ात जन्माला आलेल्या पिढीसमोर दिग्गज व्यक्तींचा आदर्श होता, पण ती पिढी पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण करू शकली नाही. या मधल्या पिढीचे प्रतिनिधी अण्णा आणि मागची आदर्शवादी पिढी यात ‘गोची’ झाली आहे. अण्णा हताश होऊन म्हणतात, ‘पोपटासारखा इतिहास पढवला, पण त्याला इतिहास कसा घडवायचा हे नाही शिकवू शकलो.

हे नाटक या दोन स्तरांवर घडते. लेखकाने यात फॅण्टसीचा वापर केला आहे. म. गांधी, नेहरू, लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी अण्णा फ्रेममध्ये आहेत. ही पात्रे नाटक घडवतात. आजच्या पिढीला समजून घेतात, तिला मार्गदर्शन करतात.

अण्णांचा नातू सनी इतिहासाच्या पुस्तकातील गांधींना गॉगल लावतो. पायात स्पोर्ट्स शूज दाखवतो. शांतिदूत नेहरूंच्या हातात ‘बॉम्ब’ दाखवतो. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात एके-४७ देतो. त्याने राजकीय माथी भडकतात. विडंबनामुळे भावना दुखावतात. त्याचा बदला घेण्यासाठी ‘भाई’ येतो. या प्रसंगातून आजच्या पिढीची मानसिकता, राजकारणाची अपरिपक्वता, तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा संधीसाधूपणा अशा वृत्तीवर लेखक बोलतो. या महान विभूतींच्या विचारांना वर्तमान स्थितीत जोखण्याचा प्रयत्नही त्याने केला असून, नव्या पिढीच्या मानसिकतेचा धांडोळाही त्याने घेतलाय. मात्र पूर्वार्धातला बहुतांशी भाग पार्श्‍वभूमी कथनात, वातावरण निर्मितीत खर्च झाला आहे.

गणेश पंडित यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून त्यांनी या नाटकाला फॅण्टास्टिक बाज दिला आहे. पात्रांनी फ्रेमबाहेर येऊन बोलणे किंवा वर्तमान प्रसंगात सामील होणे नवे नाही. येथे त्याचा वापर दिग्दर्शकाने कल्पकतेने केला आहे. पक्या आणि सनीमधील सवाल-जवाब, त्यात पक्याभाईची उडणारी भंबेरी इत्यादी गोष्टी दिग्दर्शकाने विचारपूर्वक केल्या आहेत.

सुमित पाटील यांनी जुना वाडा यथार्थपणे उभारला असून रवी योगेश यांची प्रकाशयोजना ठीक आहे. मास्टर बळवंत यांनी वेशभूषेतून पात्रे जिवंत केली आहेत. संतोष पेडणेकर यांच्या रंगभूषेचाही त्यात वाटा आहे.

सुदेश म्हशीलकर (लो. टिळक), राजेश कांबळे (म. गांधी), अतुल अभ्यंकर (पं. नेहरू), गणेश जेठे (डॉ. आंबेडकर) या चारही कलावंतांनी आपापल्या भूमिका यथार्थ केल्या. गणेश मयेकरांचा पक्याभाई हा गल्लीतील दादांचा प्रतिनिधी वाटला. दोन पिढय़ांमधील सँडवीच झालेला आणि संकटापासून पळणारा पराग बेडेकर त्यांनी यथार्थ दाखविला आहे. स्वातंत्र्यसैनिक होण्याची इच्छा अपुरी राहिलेल्या पण ऊर्मी आल्यावर बाह्या सरसावणारे अण्णा उदय सबनीस यांनी झकास दाखविले आहेत.

नितीन राणे यांनी सनीची भूमिका साकारताना आजच्या पिढीची ऊर्जा, विचार व प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. अनुज साळुंकेचा छोटा गणेश ठीक वाटला.

- राजा कारळे