बाजार सावरला!

मुंबई। दि.२३ (प्रतिनिधी)

दिवसभर झालेल्या चढ-उतारानंतर आज सेन्सेक्स ४५ अंकांनी वधारून २0 हजारांचा पल्ला ओलांडला. विशेषत: भारती एअरटेल, आयटीसी, टाटा पॉवर आणि हीरो मोटोकॉर्प यांच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.

कराच्या पायाची व्याप्ती वाढविली जाईल आणि महसूल वाढविला जाईल, असे विधान वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी आज सिंगापूर येथे केले. त्याचा परिणामही शेअर बाजारावर झाला. मागील सत्रात सेन्सेक्स १२0 अंकांनी घसरला होता. तो आज ४५.0४ अंकांनी वधारला आणि २0,0२६.६१ वर बंद झाला.

भारती एअरटेल ४.४ टक्क्यांनी वधारला. एअरटेलने काही विशिष्ट दर वाढविले आणि वापरातील मोफत मिनिटांचा अवधी कमी केला. टू-जी डाटा प्लॅनमध्ये दर वाढल्यानंतर महिनाभरात हे दर वाढले आहेत. आज आयटी आणि भांडवली सामानाच्या खंडातील शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. व्यापक आधारावरील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच ‘निफ्टी’ ५.८0 अंकांनी वधारून ६,0५४.३0 अंकांवर बंद झाला. बँकिंग क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्सनाही चांगली मागणी होती. दुसरीकडे आज जागतिक बाजारात मात्र किरकोळ घसरण झाली. हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि तैवान येथे 0.८१ टक्क्यांनी घसरण झाली, तर चीन आणि सिंगापुरात बाजार 0.२५ टक्के ते 0.३५ टक्क्यांनी वधारला. युरोपातील बाजारात संमिश्र वातावरण होते.