बालदिनी दिसणार भारतीय गुगल डुडल..

चंदिगढच्या चिमुकल्यांची देशाला दिवाळी भेट

चंदिगढ। दि. १२ (वृत्तसंस्था)

आज बालदिनी भारतासह इतर देशांतीलही गुगलच्या कोट्यवधी युर्जसच्या होमपेजवर एका भारतीय चिमुरड्याचे चित्र दिसणार आहे. ऐन दिवाळीत चिमुरड्याने हा इतिहास रचत जणू संपूर्ण देशालाच दिवाळी भेट दिली आहे.

केंद्रीय विद्यालयात इयत्ता ९ वीत शिकणार्‍या अरुण कुमार यादवने ‘डुडल 4 गुगल’ या स्पर्धेत काढलेले चित्र डुडलसाठी निवडण्यात आले आहे. स्पर्धेत भारतातील ६0 शहरांतून २ लाख चित्रे आली होती. ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ हा यंदाच्या स्पर्धेचा विषय होता. चार वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. लहान मुलांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील कलागुणांना संधी देणे हा आमचा प्रमुख हेतू असल्याचे गुगल इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी सांगितले. जगातील ४१ राष्ट्रांसह आम्ही गुगल आर्ट प्रोजेक्टची सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातील प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार अजित निनान आणि अभिनेते बोमन इराणी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सोमवारी रेल्वे संग्रहालय, नवी दिल्ली येथे झालेल्या सत्कार समारंभात या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.