ब्रशभर निसर्ग

चित्रभाषा

- शर्मिला फडके

कॅनव्हासमधून उफाळून येणार्‍या, चौकोनी आकारांच्या रेषांना न जुमानणार्‍या लाल-पिवळ्या आणि निळ्या ज्वाळा, रंगांचे उष्ण केशरी फटकारे आणि त्यातून कधी वर तरंगत येणारे, पुन्हा खोल दबले जाणारे शुभ्र त्रिकोण आणि अमाप ऊर्जा-स्त्रोतांनी भरून ओसंडणारे त्यातलेच तम-शून्य असे काळे बिंदू. रझांची ही ‘राजस्थान’ची व्हायब्रन्ट निसर्गचित्रं अनेक वर्षांनी पुन्हा प्रदर्शनामधून दिसली.

घनगर्द, दाट हिरव्या रंगाच्या प्रवाही लाटांमधून त्यांनी साकारलेली मध्य प्रदेशातली दाट अरण्यंही त्यात होती. वणव्यांच्या केशरी जिभा त्यातून लपापत होत्या, नजरेला हा रंगांचा उष्णपणा, थंडावा, दाटपणा स्पर्श करून जात होता. निसर्गाची निर्मितीक्षमता आणि विध्वंसाचं चक्र, उत्पत्ती-लयाचा खेळ, ऊर्जा, उत्साह आणि सखोल गूढार्थ उलगडण्याचा प्रयत्न करणारी रझांची ही निसर्गचित्रं. डोंगर-झाडं-नद्या आणि प्रदेशाचं हुबेहूब चित्रण करणार्‍या पारंपरिक निसर्गचित्रणापासून निसर्गाच्या मूलतत्त्वांपर्यंत, निरंतर अवकाशाच्या पोकळीपर्यंत आणि नैसर्गिक रंग-आकारांच्या रचनांपर्यंत, अमूर्त निसर्गचित्रणापर्यंत पोहोचवणार्‍या प्रवासातील हा एक महत्त्वाचा असा टप्पा आहे.

आजूबाजूचा निसर्ग दिसतो तसा काढणं, झाडं, डोंगर, दरी, नदी, चंद्र-सूर्य, घरं इत्यादींना हुबेहूब कॅनव्हासवर रंगवणं म्हणजे निसर्गचित्र ही अत्यंत ढोबळ, इयत्ता चौथीपर्यंतची संकल्पना. निसर्गचित्राचा अर्थ निसर्गाचं चित्र, ज्यात या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असायलाच हवा हे गृहीतक मान्य करूनही निसर्ग म्हटला म्हणजे तो देखणा, मन लुभावणारा, प्रसन्न रंगछटांचा शिडकावा करणारा, भव्य असाच असायला हवा हा समज किंवा आग्रह मात्र नक्कीच भाबडा आणि अपरिपक्व. डोळसपणे निसर्गाकडे पाहणार्‍यांना निसर्गाच्या भव्यपणाखेरीज त्याचा रौद्रपणा, मनमोहकतेइतकीच क्षणात विध्वंस घडवून आणणारी त्याच्यातली सुप्त ताकद, देखणेपणासोबतच मानवाने त्याच्यावर ओढलेल्या क्रूर रेघोट्या, त्याला माखलेली प्रदूषणाची काजळी, प्लॅस्टीकचा विळखा हेही दिसत असतं. मात्र ‘निसर्गचित्र’ रंगवताना ते या सगळ्यासकट कॅनव्हासवर रंगवायला हवं हे भान असणारे सजग चित्रकार आजही हाताच्या बोटावर मोजता येतील इतके मोजके आहेत.

मानवी संस्कृतीच्या पहाटकालापासूनच मानवाने आजूबाजूचा निसर्ग त्याला जसा दिसला तसा रेखाटण्याचा प्रयत्न केला. गुहेतल्या मानवाने उदरभरणाकरता, स्वसंरक्षणाकरता त्याचं लक्ष प्राण्यांवरच केंद्रित होतं म्हणूनही असेल, निसर्गातल्या प्राण्यांना रेखाटनांचा विषय बनवलं.

निसर्ग जसा दिसतो त्यापेक्षा तो कसा भावतो हे जाणून घेऊन निसर्गचित्रात आपल्या मनाने इतरही काही गोष्टी-घटकांचा अंतर्भाव करणारे पहिले चित्रकार चिनी वंशाचे होते. एका प्राचीन चिनी चित्रकार-कवीनं लिहून ठेवलं आहे की, बासरीच्या मंजुळ ध्वनीचे पडसाद मला नदीच्या पात्रामध्ये ऐकायला येतात. निसर्गात मानवी संवेदना शोधण्याचा, त्यांना शब्दांमध्ये, चित्रांमध्ये उतरवण्याचा हा प्रयत्न सातत्यानं होत राहिला. जगभरातल्या निसर्गचित्रांमध्ये तिथली जमीन, अवकाश यासोबतच तिथली संस्कृती, विचार, तत्त्वज्ञानही उमटत राहिलं.

निसर्ग चित्रामध्ये उतरवणं म्हणजे आपण स्वत:ला निसर्गापासून अलग करून घेऊन त्याच्याकडे तटस्थपणे, परकेपणानं पाहाणं असा विचार आधुनिक निसर्गचित्रांच्या बाबतीत पायाभूत आहे. निसर्ग म्हणजे मुळात एक निरंतर अवकाश. त्यामुळे या अवकाशाला, स्पेसला चितारण्याची संकल्पना आपल्याकडे चित्रकार गायतोंडेंनी स्वत:च्या सखोल चिंतनातून कॅनव्हासवर साकारली. अवकाशातल्या जड घटकांना दूर समुद्रातील क्षितिजरेषेपर्यंत लोटत नेऊन चितारलेली त्यांची अमूर्त निसर्गचित्रं अद्भुत आहेत.

निसर्गचित्र रंगवत असताना निसर्गातील सर्जनशक्तीचा अखंड स्त्रोत चित्रकाराला मोहात पाडतो म्हणूनही कदाचित, जवळपास प्रत्येक चित्रकार आपल्या कारकीर्दीत निसर्गचित्रांचे अनेक प्रयोग करून पाहत असतो. रझा किंवा गाडेंसारख्या ‘प्रोग्रेसिव्ह’ विचारधारेच्या चित्रकारांचा प्रवास मूर्ताकडून अमूर्ताकडे कसा होत गेला हे पाहायचं असेल, तर त्यांची निसर्गचित्रं अभ्यासावी. निसर्गातील रुजण्याच्या, निर्मितीक्षमतेचा, प्रचंड आणि अक्षय ऊर्जेचा साठा असणार्‍या तम-शून्य बिंदूचा, मूलभूत आकार-रचनांचा, सौर-रंगांचा, नाद-स्वरांचा प्रत्यय रझा, रामकुमारांच्या अँब्स्ट्रॅक्ट लॅन्डस्केप्समधून, अकबर पदमसींच्या मेटास्केप्समधून अतिशय प्रत्ययकारकतेनं आपल्याला येतो कारण ती चितारण्याआधीच त्या चित्रकारांचा स्वत:चा असा निसर्गातील मूलतत्त्वांकडे पोहोचण्याचा प्रगल्भ प्रवास सुरू झालेला असतो आणि मग टप्प्याटप्प्याने ते त्यांची अनुभूती कॅनव्हासवर चितारतात.

मुळात ‘निसर्गचित्र’ हा प्रकार आपल्याकडे आला तो हिंदुस्थानात प्रवास करत आलेल्या युरोपियन प्रवासी-चित्रकारांमार्फत. निसर्गाची भव्यता, सौंदर्य, परिसराचा हुबेहूबपणा आपल्या चित्रामध्ये उमटवणं हे या प्रवासी चित्रकारांचं मुख्य काम होतं. भौगोलिक दस्ताऐवजीकरण हाही एक हेतू या निसर्गचित्रांना चितारण्यात अंतर्भुत होता.

सुंदर निसर्गचित्रण करणार्‍या चित्रकारांची वैभवशाली परंपरा आपल्याकडे स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचं शिक्षण घेतलेल्या चित्रकारांनी निर्माण केली. त्याचा प्रभाव रसिकांच्या मनावर दीर्घ काळ टिकला. अजूनही एस. एल. हळदणकर, एम. के. परांडेकर, एल. एन. तासकर, डी. सी. जोगळेकर, ठाकूरसिंग या चित्रकारांच्या सौंदर्यपूर्ण निसर्गचित्रांना विसरता येत नाही. बंगाल स्कूलमध्येही निसर्गचित्रणाची प्रभावी परंपरा होती. अबनीन्द्रनाथ टागोर, नंदलाल बोस, बिनोद बिहारी मुखर्जी यांची तरल, निसर्गचित्रं आजही मोहात पाडतात.

स्वातंत्र्योत्तर काळात मात्र एकंदरीतच भारतीय चित्रकलेत नवे विचार, नव्या जगातील आधुनिकतेचा प्रवेश झाला. गोपाल घोष, सूझा, बाक्रे, के. एस. कुलकर्णी, गणेश हलोई, राम कुमार, अकबर पदमसी यांनी चितारलेली निसर्गचित्रं ही खर्‍या अर्थाने वास्तववादी, आधुनिक होती. प्रोग्रेसिव्ह आर्ट चळवळीच्या विचारधारेतील चित्रकारांनी चितारलेल्या कन्टेम्पररी किंवा आधुनिक, समकालीन चित्रांमध्ये अनेक अमूर्त निसर्गचित्रं आहेत. त्यात ‘निसर्ग’ कुठे दिसतो अशी हेटाळणीयुक्त टीका अजूनही अनेकदा अपरिपक्वतेनं केली जाते.

चित्रकारांनी त्यांच्या वैयक्तिक क्रिएटिव्ह विचारप्रक्रियेला अनुसरून निसर्गातील घटकांची, मूलतत्त्वांची मांडणी कॅनव्हासवर केली, आकार-रंगांची, रचनांची पुनर्मांडणी केली, कधी अत्यंत साधे, बेसिक आकार घेतले, कधी निसर्गातील घटकांचा, त्याच्या रौद्र किंवा शक्तिशाली रूपाचा आपल्या मनावर झालेला परिणाम महत्त्वाचा मानून त्याला निसर्गचित्रात महत्त्वाचं स्थान दिलं, तर साहजिकच निसर्गचित्र हे रूढ अर्थाने आपल्या नजरेला ज्याची सवय आहे त्या नदी, डोंगर, झाडांच्या सौंदर्याला टिपणार्‍या निसर्गचित्रापेक्षा वेगळं दिसतं. पण तेच खर्‍या अर्थानं निसर्गचित्र असतं, हा विचार अजूनही चित्र-रसिकांनी स्वीकारला आहे, असं ठामपणे म्हणता येत नाही.

निसर्गातल्या गूढतेचा, रहस्यमयतेचा, आध्यात्मिक शांततेचा, भीषण वास्तवाचा, अद्भुततेचा, गांभीर्याचा आणि क्षणभंगुरतेचा प्रत्यय जर निसर्गचित्रामधून आला नाही, मानवी संवेदनांची प्रतिक्रिया त्यातून उमटली नाही आणि केवळ नजरेला सुखवणारे रंगा-आकारांचं सौंदर्यच जर त्यातून दिसलं तर चित्रकाराच्या हातून निसर्गावर झालेला तो सर्वात मोठा अन्यायच असतो हे निश्‍चित.

(समाप्त)