भारतविरोधी युद्ध अविरत सुरू ठेवा

इस्लामाबाद। दि. २८ (वृत्तसंस्था)

पाकिस्तान सरकारने भारताविरोधात युद्ध चालूच ठेवले पाहिजे अशी पूर्वअट तालिबानने सरकारशी शांतता वाटाघाटी करण्यासाठी तसेच युद्धबंदीसाठी घातली आहे. अफगाणिस्तानातील बंडखोरांविरोधात कारवाई बंद करा आणि भारताशी चाललेले वाटाघाटींचे नाटक बंद करून पुन्हा संघर्ष सुरू करा असे तालिबानने सरकारला बजावले आहे. तालिबानने सरकारला या संदर्भात एक पत्र लिहिले असून, शस्त्रास्त्रे खाली ठेवण्यासाठी आपल्या अटी स्पष्ट केल्या आहेत. देशात शरीयत कायदा लागू करणे व अमेरिकेची मैत्री तोडणे याही अटी या पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत.

तालिबानचा प्रवक्ता अमीर मुवैया याने हे पत्र सादर केले आहे. अफगाणिस्तानने नाटो सैन्याची कारवाई थांबवून तालिबानशी शांतता वाटाघाटी सुरू केल्या आहेत, तर पाकिस्तानात तालिबानमध्ये मोठी फूट पडल्याचे वृत्त आहे.