भारताची ‘नंबर वन’ची संधी हुकली

नवी दिल्ली।

दि. ३१ (वृत्तसंस्था)

कर्णधार महेंद्रसिंह धोनीने झुंजार शतकी खेळी करूनही पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे २0१२ चा शेवट अव्वल क्रमवारीने करण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले.

सलामीच्या वन-डे लढतीत पाककडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघाला दोन रेटिंग गुणांचे नुकसान सोसावे लागले. सध्या

टीम इंडियाच्या खात्यात ११८ रेटिंग गुण असून वन-डे क्रमवारीत संघ तिसर्‍या स्थानावर विराजमान आहे. पाकविरुद्धच्या लढतीत भारताला विजय संपादन करता आला असता, तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेप्रमाणे भारताचे १२१ रेटिंग गुण झाले असते;मात्र दशांश गुणफरकाने टीम इंडिया या दोन्ही संघांच्या पुढे असती आणि त्यामुळे टीम इंडियाचा वर्षाचा शेवट नंबर वनने झाला असता;मात्र टीम इंडियाने ही सुवर्णसंधी गमावली.

पाकविरुद्ध होणार्‍या दुसर्‍या आणि तिसर्‍या वन-डे लढतीत भारताने विजय मिळविला तरीही आता संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचू शकत नाही, तसेच या दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला तर भारताला केवळ ११४ रेटिंग गुणांवर समाधान मानावे लागणार आहे.