भेटवस्तूंसाठी सुका मेवा बेस्ट

बिरवाडी। दि. १३ (वार्ताहर)

दीपोत्सव आणि गोड फराळांचा सण म्हणजे दिवाळी. गोड पदार्थांचा आस्वाद घेत दिवाळी साजरी करण्याची पारंपरिक पद्धत आजही अबाधित आहे. कंपन्यासुद्धा यात मागे नाहीत. आपल्या कंपनीतील कामगारांना, हितचिंतकांना दिवाळी निमित्त दरवर्षी दिवाळीत मिठाईचे वाटप करण्यात येते. मात्र दिवाळीत गोड खाऊन कंटाळा येतो, अनेकदा खव्याची मिठाई खराब होत असल्याने यंदा सुक्या मेव्याला अनेकांनी पसंती दिली आहे.

शासकीय, प्रशासकीय अधिकार्‍यांसहित समाजातील मान्यवर मंडळींसोबत स्नेहसंबंध दृढ करण्यासाठी कंपनीतर्फे नेहमीच प्रयत्न सुरू असतो. अशावेळी दीपावलीनिमित्त भेटवस्तूंसहित मिठाई देण्याची पद्धत आहे. मात्र मागील काही वर्षांपासून मिठाईसाठी वापरण्यात येणारा मावा किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीमुळे यावेळी मिठाईपेक्षा ड्रायफ्रूूट्सलाच अधिक पसंती देण्यात येत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.