भ्रष्ट चौटालांची ‘भरती’ तुरुंगात!

- पिता-पुत्रास १0 वर्षांचा कारावास

- समर्थकांचा कोर्टाबाहेर हैदोस

नवी दिल्ली। दि. २२ (लोकमत न्यूज नेटवर्क)

बारा वर्षांपूर्वी ३,२0६ कनिष्ठ प्रशिक्षित शिक्षकांची भ्रष्टाचाराने भरती केल्याबद्दल येथील एका न्यायालयाने आज पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले भारतीय लोकदलाचे ७८ वर्षांचे नेते ओमप्रकाश चौटाला व त्यांचे चिरंजीव अजय चौटाला यांना १0 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. मुख्यमंत्री म्हणून केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल शिक्षा झालेले चौटाला हरियाणाचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले.

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखालील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश विनोद कुमार यांनी या खटल्यात चौटाला पिता-पुत्रांसोबत एकूण ५५ आरोपींना गेल्या आठवड्यात विविध गुन्ह्यांसाठी दोषी ठरविले होते. आज त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या. एकूण नऊ आरोपींना १0 वर्षांच्या शिक्षा झाल्या. त्यात ओमप्रकाश व अजय चौटाला यांच्याखेरीज संजीव कुमार व विद्याधर या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकार्‍यांचा व शेरसिंग बजशामी या विद्यमान आमदाराचा समावेश आहे. गुन्हे घडले तेव्हा सजीव कुमार हरियाणा सरकारचे प्राथमिक शिक्षण संचालक, विद्याधर त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या चौटालांचे विशेष कार्य अधिकारी व बजशामी त्यांचे राजकीय सल्लागार होते. आणखी एका आरोपीला पाच वर्षांच्या तर ४५ आरोपींना प्रत्येकी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. दोषी ठरल्यानंतर न्यायालयात कोठडीत घेतल्यापासून इस्पितळात दाखल झालेले मोठे चौटाला आज न्यायालयात हजर नव्हते. मात्र, त्यांच्या मुलासह सर्व आरोपी हजर होते.