मन करा रे प्रसन्न

रायगड पोलिसांचा अभिनव प्रबोधन उपक्रम

अलिबाग। दि. १८ (विशेष प्रतिनिधी)

मानसिक ताणतणाव, त्यामधून उद्भवणार्‍या उच्च रक्तदाब, हृदयरोगासारख्या व्याधी, यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी मन करा रे प्रसन्न हा अभिनव उपक्रम जिल्हय़ात राबविला जाणार आहे. रायगड जिल्हा पोलीस, रायगड मेडिकल असोसिएशन (आरएमए) आणि ट्रस्ट इंडिया फाऊंडेशन(टीआयएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड मेडिकल असोसिएशनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ उद्या शनिवार दि. १९ मे रोजी क्षात्रेक्य माळी समाज हॉल, कुरुळ-अलिबाग येथे संध्याकाळी ५ वा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रविशारद आणि मुंबईतील जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती रायगडचे पोलीस उप अधीक्षक वाय.व्ही.गाडेकर आणि राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ परिषदेचे सदस्य तथा आरएमएचे सल्लागार डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी दिली.

अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव, o्रीवर्धन, मुरुड येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यात मानसिक ताणतणाव मुक्तीसाठी ताणतणाव व्यवस्थापन, हृदयरोग प्रतिबंध, नेत्रदान एक सामाजिक गरज आणि तिच्या सुरक्षेसाठी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध या विषयांवर राज्यातील मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे आणि शंका समाधानाकरिता वेळ दिला जाईल.