महामार्ग सावलीविना..

दत्ता म्हात्रे। दि. १६ (पेण)

कोकणची जीवनवाहिनी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - १७ च्या दोन्ही बाजूस उभे असलेले शतकापूर्वीचे जुनाट वटवृक्ष, चिंचेची झाडे एकेकाळी महामार्गाची शान वाढवीत होती. महामार्गाच्या २४0 किमी प्रवासात शेकडो वर्षे सावली देणारी ही झाडे महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान मात्र कुर्‍हाडीचे घाव घालून तोडण्यात आली आहेत.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. वनचरे म्हणत वृक्षाचे महत्त्व लक्षात आल्याने शासनानेही वनीकरणाच्या अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. इमारती उभ्या राहत असताना आणि विकास प्रकल्पांच्या निर्मितीवेळी मात्र अनेक वृक्षांची अशीच कत्तल होत असल्याने शासनाच्या या योजनांबाबतच आश्‍चर्य व्यक्त होत आहे. एकेकाळी झाडा- पेडांनी हिरवागार असलेला कोकणही आता ओसाड बनत चालला आहे. पूर्वी महामार्गाच्या कडेने पक्ष्यांमार्फत होणार्‍या बीजप्रसारातून ही वृक्षसंपदा निर्माण झाली, मात्र आता कुर्‍हाडीचा घाव पडत असल्याने ही वनसंपदा नष्ट होत आहे. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात भराव टाकून शतकापूर्वीचे हे हजारो महाकाय वृक्ष तोडले जात आहेत.

या झाडांना जैवशास्त्रीयदृष्ट्या महत्त्व असून सुमारे ३0 टक्के पक्षी आणि छोटे प्राणी निवार्‍यासाठी या मोठय़ा झाडांवर अवलंबून असतात. या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने, खार, मुंगूस, सरडे, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची घरटी व निवास तुटल्याने निसर्ग साखळीच तुटून पडते. पर्यावरणातील कार्बनची साठवण आणि मातीतील अन्नद्रव्य यांच्यावरही संकट ओढवते. फळे, फुले, पाने आणि पराग यांच्या माध्यमातून मोठय़ा झाडांचे प्रचंड योगदान असल्याने त्यामध्येही संकटे येऊन जैवविविधतेला प्रचंड धोका संभवतो.

वाढणारी लोकसंख्या, वाढते नागरीकरण आणि रस्त्याचे जाळे या गतिमान विकासकामात जुनाट वृक्षांचे महत्त्व पर्यावरणासाठी उपयुक्त असल्याने याच झाडांचा होत असलेला विनाश पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. सध्या रस्ता रुंदीकरण भरावाच्या कामात पेणपासून - नागोठणेपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या कडेने असणारी ही मोठी झाडे सर्रास तोडण्याचे काम सुरु आहे. या झाडांची होणारी कत्तल पाहून पर्यावरणप्रेमी नागरिकांचे हृदय हेलावते.