मिठाईत अँल्युमिनिअमचा वर्ख

पुणे। दि. १३ (प्रतिनिधी)

दिवाळीनिमित्त मिठाईला मागणी प्रचंड वाढलेली आहे. कमी खर्चात जास्त पैसे कमावण्यासाठी काही मिठाईवाले तिच्यावर चांदीचा वर्ख म्हणून अँल्युमिनिअमचा वर्ख लावत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिठाईवर लावलेला वर्ख हा चांदीचाच आहे की अँल्युमिनिअमचा, हे ओळखणे अवघड असल्याने ग्राहक त्याला फसत असल्याचे दिसते.

मिठाई अधिक आकर्षक दिसण्यासाठी तीवर अनेक वर्षांपासून चांदीचा वर्ख लावला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांत चांदीचा भाव वेगाने वाढला नि दुप्पट झाला आहे. त्यामुळे चांदीच्या वर्खाच्या किमतीही वाढल्या आहेत. कमी किमतीत मिठाई विकणार्‍या मिठाईवाल्यांना चांदीचा वर्ख परवडत नसल्याने ते अँल्युमिनिअमचा वर्ख वापरत आहेत. अँल्युमिनिअरमचा वर्ख मिठाईवाल्यांना पुरविणारी टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिठाईवर लावलेला अँल्यु मिनिअमचा वर्ख शरीरात गेल्यानंतर आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. याविषयी आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, ‘‘एकदा अशी मिठाई खाल्ल्यामुळे लगेचच त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो असे नाही; मात्र अँसिडिटीचा त्रास होऊ शकतो. मात्र, सलग ही मिठाई खाण्यात आली, तर किडनी, यकृत निकामी होण्याचा धोका ओढावतो. तसेच रक्तातील पेशीही कमी होतात. याचे दूरगामी परिणामही दिसून येतात. लहान मुलांनी अशा मिठाईचे सेवन केल्यास भविष्यात त्रास होऊ शकतो.’’