मुंबईकर लटकले..

मुंबई। दि. ७ (प्रतिनिधी)

पेन्टाग्राफ अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने बुधवारी मध्य रेल्वे विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कामावरून घरी परतणार्‍यांची तारांबळ उडाली.

प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरून पावणे सहाच्या सुमारास सुटणार्‍या आसनगाव जलद लोकलने सीएसटी सोडताच या लोकलचा पेन्टाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला आणि ओव्हरहेड वायर तुटली. आसनगाव लोकल सीएसटीहून सुटतानाच एका रुळावरुन दुसर्‍या रुळावर जात असतानाच (क्रॉस) ही घटना घडल्याने मेन लाईनची समस्या आणखीनच वाढली. पेन्टाग्राफ आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यासाठी रेल्वेने सीएसटी ते मश्जिद बंदर दरम्यानचा ओव्हरहेड वायरला होणारा वीज पुरवठाच खंडीत केला. याचा परिणाम सीएसटीहून सुटणार्‍या मेन लाईन आणि हार्बरवर झाला. सीएसटी ते भायखळा आणि सीएसटी ते वडाळा या दरम्यान चालणार्‍या सेवेला याचा मोठा फटका बसल्यामुळे मेन लाईन आणि हार्बरवरुन डाऊनला जाणारी पर्यायी व्यवस्था मध्य रेल्वेने शोधली. दादरपासून कल्याण, कर्जत, कसाराला जाणार्‍या गाड्या आणि वडाळाहून अंधेरी आणि पनवेलला जाणार्‍या लोकल सोडण्यात येत होत्या.

यामुळे सर्वच स्थानकांवर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. लोकल कोणत्या कारणाने उशिरा धावत आहे, याची उद्घोषणा रेल्वेकडून करण्यात येत होती. मात्र ही समस्या कधी सुटेल असा प्रश्न प्रत्येक चाकरमान्याच्या चेहर्‍यावर दिसत होता.

काही स्थानकांवरील इंडिकेटर्सचा बोर्‍याच वाजला होता. पावणे सातच्या सुमारास पेन्टाग्राफ आणि ओव्हरहेड वायरची समस्या सोडवल्यानंतर आसनगाव लोकल रद्द करुन ती यार्डात पाठवली. ही समस्या सुटल्यानंतर सीएसटी ते वडाळा आणि सीएसटी ते दादर दरम्यानची वाहतूक सव्वा आठच्या सुमारास सुरळीत करण्यात आली. वाहतूक सुरळीत झाल्याने सुटकेचा निश्‍वास चाकरमान्यांनी टाकला. तरीही लोकल रात्रीपर्यंत उशिरानेच धावत होत्या. या घटनेमुळे लोकलच्या ६0 फेर्‍या रद्द करण्यात आल्या.

सीएसटी स्थानकातील गोंधळामुळे

ठाणे व कल्याण रेल्वे स्थानकांत संध्याकाळी घरी परतणार्‍या चाकरमान्यांची येथील डाऊनच्या फलाटात तोबा गर्दी झाली होती.

त्यामुळे कल्याण स्थानकातून कसारा मार्गावर विशेष लोकल सोडावी, या मागणीसह कल्याण स्थानकात राजेश घनघाव, जितेंद्र विशे आदींसह शेकडो प्रवाशांनी हंगामा केला.

त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने निर्णय घेत येथून ८.१५/८.३0च्या सुमारास विशेष लोकल सोडण्यात आल्याचे घनघाव यांनी सांगितले.