मुंबईकर हळहळले!

- ठिकठिकाणी कँडल मार्च, मूकमोर्चे, निदर्शने; बलात्कार्‍यांना फाशीच हवी

मुंबई। दि. २९ (प्रतिनिधी)

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृत्यूची बातमी कळताच अवघ्या मुंबापुरीवर शोककळा पसरली. १३ दिवस मृत्यूशी झुंज देणार्‍या त्या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी कँडल मार्च, निदर्शने आणि मूकमोर्चे काढण्यात आले.

विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे आझाद मैदान, दादर, जुहू, वांद्रे, मालाड येथे एकत्र येऊन मुंबईकरांनी तरुणीला श्रद्धांजली वाहिली. दादर येथे महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणार्‍या स्त्रीमुक्ती संघटनांनी एकत्र येऊन स्वामी नारायण मंदिर ते प्लाझा सिनेमा या ठिकाणी मोर्चा काढला. यात तीन वर्षांच्या चिमुरडीपासून साठीच्या आजीनेही सहभाग घेतला होता. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाची बळी ठरलेल्या तरुणीच्या मारेकर्‍यांना शिक्षा मिळावी, अशी मागणी या संघटनांच्या सदस्यांनी केली. वाघिणी संस्थेतर्फे वीर कोतवाल मैदानात श्रद्धांजली वाहण्यात आली. यात विद्यार्थी भारती, मराठी भारती, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच इ. संघटनांनी सहभाग घेतला होता. या संघटनेतर्फे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करा, महिलांच्या सुरक्षेसाठी कृतिशील पावले उचला अशा मागण्या केल्या. जुहू येथे झालेल्या कँडल मार्चमध्ये विविध स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता.

चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनसप्रमाणेच वेगवेगळ्य़ा रेल्वे स्थानकांबाहेर मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेत मुंबईकरांनी मुलीच्या दुर्दैवी मृत्य़ूबद्दल शोक व्यक्त केला.

सकाळी ११ वाजताच्या सुमारास मयांक गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम

आदमी पार्टीच्या सदस्यांनी आझाद मैदानात निदर्शने करत सरकारचा

निषेध केला.

मुंबई भाजपातर्फे आंदोलनात महिलांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निषेधाच्या घोषणा देत आझाद मैदान दणाणून सोडले. या घटनेच्या चौकशीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे तसेच बलात्कार्‍यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांनी केली.

जन्म दिलेली मुलगी सुरक्षित नसेल तर नव्या मुली जन्माला तरी कशा येणार? देशाची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा सुरक्षित नसल्याबद्दल भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी खंत व्यक्त केली.

कायदे असूनही अंमलबजावणी नाही त्यामुळे बलात्कारी सुटत आहेत, मात्र पीडित महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे योग्य प्रशासनिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे सांगत अवामी विकास पार्टीच्या महिलांनी बलात्कार्‍यांना कडक शासन करावे, अशी मागणी केली.

सादिक मेमोरियल सोसायटीतर्फे मुंबई प्रेस क्लब येथे पार पडलेल्या कार्यक्रमात रिफाथ सिदकी आणि

सुनीती चौहान यांनी देशातील एकूणच परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.